कापसाची खरेदी करत शेतकऱ्याची तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील एका शेतकऱ्याची ४४ क्विंटल कापसाची खरेदी करत सव्वा चार लाखात शेतकऱ्याची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील एका शेतकऱ्याची ४४ क्विंटल कापसाची खरेदी करत सव्वा चार लाखात शेतकऱ्याची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील कमलाकर उखा गुजर (वय-४८) हे परिवारासह वास्तव्यास आहे. गुजर हे शेतकरी असून त्यांची ओझर शिवारात साडे चार एकर शेतजमीन आहे. दरवर्षी शेतात ते कपाशी, मका, ज्वारी या पिकाची लागवड करीत असतात. यंदाच्या हंगामात गुजरनी शेतात कपाशीची लागवड केलेली होती. कापूस वेचून झाल्यानंतर घरातच त्याची साठवणूक केली होती.

    दरम्यान गुजर हे कापसाची विक्री करण्यासाठी प्रविण सुभाष देशमुख (रा. शिवशक्ती नगर, टाकळी प्र.चा) यांना विचारणा केली असता. त्यांनी कापूस ९ हजार ६०० रूपये प्रति क्विंटल खरेदी करण्यासाठी होकार दिला.

    प्रविण देशमुख यांनी गुजरची कापूस २५ व २६ जानेवारी २०२२ अशा दोन दिवसात ४४.९८ क्विंटलाची खरेदी केली. त्याची किंमत ४ लाख ३१ हजार ४२४ रूपये इतकी आहे. खरेदी केल्यानंतर देशमुखांनी दोन-तीन दिवसात पैसे देण्याचे सांगितले. त्यानंतर गुजरने प्रविण देशमुखांकडे पैशाची मागणी केली. त्यावर देशमुखांनी दोन-तीन वेळा गुजरला चेक दिले.

    परंतु सदर चेक खाली असल्याने खात्यावर पैसे वर्ग होऊ शकले नाही. म्हणून गुजरने अधिक तपासणी केली असता देशमुख यांनी आजूबाजूच्या लोकांचीही फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. म्हणून माझीही फसवणूक केल्याचे खात्री झाल्यावर गुजर यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठत प्रविण देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.