शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे; पेरण्या खोळंबल्याने बळीराजा चिंतेत

भोर तालुक्यातील पूर्व भागात भाजीपाला व बागायती शेती होत असली तरी पश्चिम भागात भात हे मुख्य पीक आहे. येथील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था भात पिकावराच अवलंबून असते. मात्र, जून महिना निम्मा संपत आला तरी पाऊस न पडल्याने भाताच्या रोपांसाठी तरवे अद्याप तयार झाले नाहीत.

    भोर : भोर तालुक्यातील शेतकऱ्याने खरीप पेरणीपूर्व मशागतीची काम पूर्ण केली असून, पेरणीसाठी सज्ज असला तरी जून महिना निम्मा संपत आला असून, पावसाच्या दांडीमुळे खरीपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर भात पिकांचे तरवे अद्याप टाकण्यात आले नाहीत. पावसाने पाठ फिरवल्याने हवालदिल झालेला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

    भोर तालुक्यातील पूर्व भागात भाजीपाला व बागायती शेती होत असली तरी पश्चिम भागात भात हे मुख्य पीक आहे. येथील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था भात पिकावराच अवलंबून असते. मात्र, जून महिना निम्मा संपत आला तरी पाऊस न पडल्याने भाताच्या रोपांसाठी तरवे अद्याप तयार झाले नाहीत. ज्या पश्चिम भागात धूळवाफेवर भात पेरणी होते. तेथे देखील पाऊस पडला नसल्याने ही भात पेरणी देखील रखडली आहे. एकंदरीत यावर्षी उशिरा पाऊस झाल्यास भातपिकाची रोपे तयार होण्यास वेळ लागणार आहे. पर्यायी भात लावणीसाठी देखील वेळ लागणार असून, यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

    वळवाचा पाऊस देखील म्हणावा तसा न झाल्याने शेतकऱ्याला भुईमूग, सोयाबीन व कडधान्य पेरणीसाठी वाट पाहणे पसंत केले आहे. मात्र, पाऊसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी निराश झाला आहे. आत्तापर्यंत भात, रोपे, उगवून वर येणे आवश्यक असताना अद्याप पेरणीच झाली नाही. त्यामुळे यापुढे किती वेळ लागणार याची शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे.

    भोर तालुक्यातील शेतकऱ्याने मागील पंधरा दिवसांपूर्वी शेती कामे उरकून खरीपातील भात व कडधान्य  बी-बियाणे करून ठेवली आहेत. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीस पाऊस पडेल, ही आशा शेतकऱ्याला होती. मात्र, मान्सून हुलकावण्या देत असल्याचे चित्र आहे.