भुईमूग पिकावर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी संकटात

उन्हाळी भुईमूग पिकावर रोग किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान ठाकले असून पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे.

    यवतमाळ : शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने पिकांची नासाडी केली आहे. त्यामुळे बळराजी हवालदिल झाला आहे. अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामध्येच आता उन्हाळी भुईमूग पिकावर रोग किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान ठाकले असून पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे.

    खरीपानंतर उन्हाळी पीक म्हणून बर्‍याच शेतकर्‍यांनी भुईमूग पिकाची लागवड केली आहे. परंतु, सध्या या भुईमूग पिकावर तंबाखू पिकावरील कटवर्म नावाच्या अळीचा प्रादुर्भाव झालेला पहावयास मिळतो. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर कृषी विज्ञान केंद्राचे पथक बांधावर गेल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. किडीवर प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.