शेतकरी रहायला नांदेडला आणि शेती तेलंगणात, काय आहे बातमी? : जाणून घ्या सविस्तर

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर, भोकर या तेलंगणा सीमावर्ती भागात असणाऱ्या शेतकऱ्यांनी या विजेच्या 'शॉक'पासून आपल्या पिकांना, स्वतः ला वाचवण्यासाठी तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

    नांदेड : महाराष्ट्रात सततचे असणारे लोडशेडिंग, रात्री-अपरात्री या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल आणि यामुळे त्रस्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी. ही आता नित्याचीच बाब झाली असताना यावर शेतकऱ्यांनी मात्र आता भलताच उपाय शोधून काढलाय.

    नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर, भोकर या तेलंगणा सीमावर्ती भागात असणाऱ्या शेतकऱ्यांनी या विजेच्या ‘शॉक’पासून आपल्या पिकांना, स्वतः ला वाचवण्यासाठी तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

    तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी केली

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्या मेहनतीचे, घामाचे पैसे देऊन वीज, डेपो अथवा ट्रान्सफार्मर वेळेवर मिळावे आणि ही वीज दिवसा मिळावी यासाठी आंदोलन करावे लागते. यावर कितीही आटापिटा केला तरी रात्रीला  दहानंतर फक्त पाच तास वीज उपलब्ध होते. त्यामुळे या समस्यांना मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी करुन यावर तोडगा काढलाय.

    नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरालगत आणि तेलंगणा सीमावर्ती  असणाऱ्या येसगी गावचे रहिवाशी  44 वर्षीय सोमनाथ गंगाधर प्रचंड हे शेतकरी आहेत. बीए पर्यत शिक्षण झालेले गंगाधर प्रचंड आणि पदवी शिक्षण घेतलेले त्यांचे छोटे भाऊ उपेंद्र प्रचंड हे दोघेही आपली परंपरागत असणारी अठरा एकर शेती कसून आपला उदरनिर्वाह करतात. बिलोली तालुक्यातील येसगी हे मांजरा नदी काठी वसलेले तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती आणि एका वेगळ्या अशा लाल रेतीसाठी आणि पाणीदार गाव म्हणून या गावाची ओळख आहे.

    विजेच्या लपंडावाने आणि सततच्या लोडशेडिंगमुळे मेटाकुटीस

    गंगाधर प्रचंड आणि उपेंद्र प्रचंड या कुटुंबियांचा परंपरागत व्यवसाय हा शेती असून त्यांना अठरा एकर बागायती शेती आहे. गावलगतच मांजरा नदीचे विस्तीर्ण आणि बारा महिने डबडबून भरून वाहणारे पात्र आहे. शेतीला बारमाही, मुबलक पाणी पुरवठा असल्यामुळे भात पीक, सोयाबीन, हरभरा, ऊस, भाजीपाला, केळी, मूग, उडीद, मका ही नगदी पिके ते घेतात. परंतु मुबलक पाणीपुरवठा असतानाही विजेच्या लपंडावाने आणि सततच्या लोडशेडिंग मुळे मेटाकुटीस आले. यातच स्व:कष्टाचे आणि मेहनतीचे पैसे मोजूनही 24 तासातून फक्त पाच तास वीज पुरवठा होत होता. तर एवढा खटाटोप करूनही शेतीसाठी रात्रीला दहाच्या नंतर  फक्त पाच तास वीज मिळत होती. त्यातही ट्रान्सफार्मर जळण्याचे, विजेच्या तारा तुटण्याच्या घटनांमुळे बहरात आलेली पिके अनेक वेळा सुकली, कोमेजली आणि जळून गेली. तर रात्री बेरात्रीच्या या वीज पुरवठ्यामुळे अनेक वेळा जंगली जनावरं, साप, चोर यांचाही सामना करावा लागला.

    तेलंगणा राज्यात दोन एकर जमीन खरेदी केली

    या सगळ्या गोष्टीस कंटाळून गंगाधर आणि उपेंद्र या बंधूनी यावर एक शक्कल लढवली. सीमावर्ती राज्य असणाऱ्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा मोफत आहे. तसेच दरवर्षी पीक लागवडीसाठी ‘रयतु बंधू’ या योजनेच्या अंतर्गत एकरी सहा हजार लागवड खर्च तेलंगणा सरकार देते असे लक्षात आले. गंगाधर आणि उपेंद्र प्रचंड या कुटुंबाने सीमावर्ती असणाऱ्या तेलंगणा राज्यात दोन एकर जमीन खरेदी केली. ज्यातून तेलंगणा राज्यात घेतलेल्या शेतात 24 तास वीज पुरवठा होत असल्याने त्या ठिकाणची चोवीस तास उपलब्ध होणारी वीज आणि पाण्याचा उपयोग घेऊन, महाराष्ट्रात असणाऱ्या अठरा एकर शेतीला विजेमुळे पाणीदार केले. तेलंगणा राज्यात घेतलेल्या या दोन एकर शेतीमुळे प्रचंड यांच्या महाराष्ट्रातील अठरा एकर शेतीला चोवीस तास उपलब्ध झाली व त्यांची अडचण सोडवल्या गेली.

    दरम्यान अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोडशेडिंगच्या आणि विजेच्या त्रासास  कंटाळून सीमावर्ती भागातील अनेक शेतकऱ्यांनी तेलंगणाचा आसरा घेतला हे एक जळजळीत सत्य आहे. पण प्रचंड यांच्यासारखे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी तेलंगणात शेतजमीन घेऊन आपली अडचण सोडवू शकत नाहीत. पण याच विजेपायी अनेक शेतकरी रात्री बेरात्री शेतशिवारात फिरून, जंगली जनावरं, साप चावणे अशा घटनांची शिकार ठरतात. तर अनेकजण तार तुटून, विजेचा धक्का लागून, ट्रान्सफार्मरला चिटकून मरतात. पांढर कपाळ घेऊन फिरणाऱ्या त्यांच्या विधवा बायका आणि बापाअभावी पोरकी झालेली लेकरं  या घटनांमधून सरकारला फक्त एवढंच विचारतात, की जे तेलंगणा राज्याला जमले ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही?, असा सवाल शेतकरी करत आहेत.