शेतकऱ्यांचे ग्रहण सुटता सुटेना; लाखो रूपये मिळवून देणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतोय पाणी

कांद्याने केला वांदा अन् टोमॅटोचाही झाला चिखल असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारच्या वक्रदृष्टीमुळे कांदा व टोमॅटो कवडीमोल भावात विक्री करावा लागत आहे हे कमी काय? म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा नुकसानभरपाई एक रकमी देण्यात येईल, अशी वल्गना करणाऱ्या सरकारने 10 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

    येवला : कांद्याने केला वांदा अन् टोमॅटोचाही झाला चिखल असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारच्या वक्रदृष्टीमुळे कांदा व टोमॅटो कवडीमोल भावात विक्री करावा लागत आहे हे कमी काय? म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा नुकसानभरपाई एक रकमी देण्यात येईल, अशी वल्गना करणाऱ्या सरकारने 10 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागच्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना लाखो रूपये मिळवून देणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

    किलोला 180 रुपयांप्रमाणे असलेल्या टोमॅटोच्या दराला आता कवडीमोल भाव आला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोला 3 ते 5 रुपये किलो असा दर मिळत आहे. तर बाजार समितीत 20 किलोच्या कॅरेटला 50 रुपयांचा भाव मिळत आहे. यात 20 रुपये मजूरी 25 रुपये वाहतूक 3 रुपये आडत हमाली जात आहे. या सगळ्या खर्चाचा विचार केल्यास प्रती कॅरेट 2 रुपये उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडत आहे. या 2 रुपये उत्पन्नात घरातल्या सदस्यांचे कष्ट, बी- बियाण्याचा खर्च, रासायनिक खते इतर खर्च याचा विचार केल्यास शेती हा आतबट्टयाचा व्यवसाय असल्याची प्रचिती येते.

    येवला कृषि उत्पन्न बाजार समितीत ०१ सप्टेंबरला जो टोमॅटो २०० रुपये कॅरेट विक्री होत होता तोच टोमॅटो ११ सप्टेंबरला ५० ते ७० रु दराने विकला जात होता अशीच काहीशी अवस्था कांद्याचीही झाली असून, येवला बाजार समितीत १० दिवसात कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घसरले आहेत केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी कांद्याच्या निर्यात दराबाबत फेरविचार करण्याची मागणी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीवर अजूनही विचार झाल्याचे दिसत नाही.

    सरकार लक्ष देईल का?

    मागच्या महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सरासरी २६०० ते २८०० रुपये प्रतिकॅरेट दराने विकला गेलेला टॉमेटो सध्या ५० ते ७० रुपये प्रतिकॅरेटवर आला आहे. यामुळे टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. टोमॅटो कांद्याचे भाव वाढताच केंद्र सरकारने तत्परतेने टोमॅटो, कांदा आयात व निर्यात शुल्क वाढवत वाढणाऱ्या दरावर अंकूश आणला. परंतु आता टोमॅटोच्या दरात घसरण होत असताना सरकार याकडे लक्ष देणार का? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.