साखर कारखान्यावरील शेतकरी प्रतिनिधी गायब, सभासदात संभ्रम, कायद्याची अंमलबजावणी कधी हाेणार ?

नवीन सहकार कायद्यानुसार प्रत्येक साखर कारखान्यावर देखरेख ठेवण्यासाठी पाच शेतकरी प्रतिनिधी ठेवण्याचे धोरण ठरवले आहे. पण कायद्याची अंमलबजावणी झाल्यापासून आजअखेर साखर कारखान्यावरील शेतकरी प्रतिनिधीच नेमला नसल्याचे शेतकरी सभासदांतून बोलले जात आहे.

  कोल्हापूर : नवीन सहकार कायद्यानुसार प्रत्येक साखर कारखान्यावर देखरेख ठेवण्यासाठी पाच शेतकरी प्रतिनिधी ठेवण्याचे धोरण ठरवले आहे. पण कायद्याची अंमलबजावणी झाल्यापासून आजअखेर साखर कारखान्यावरील शेतकरी प्रतिनिधीच नेमला नसल्याचे शेतकरी सभासदांतून बोलले जात आहे.

  राज्यात कार्यरत असलेल्या साखर कारखान्यांवर शेतकरी प्रतिनिधी नेमला जावा, असा सहकार कायदा करण्यात आला आहे. मात्र कायदा झाला पण अंमलबजावणी केली नाही, अशी एकंदरीत परिस्थिती बहुतांशी साखर कारखान्यात आहे. काही कारखान्याचा अपवाद वगळता शेतकरी प्रतिनिधी आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. याबाबत कुठल्याही शेतकरी संघटनेने आवाज उठवलेला नाही अथवा सहकार आयुक्त सुद्धा याबाबत अनभिज्ञ राहिले आहेत.

  सहकार कायद्यानुसार शेतकरी प्रतिनिधी नेमणे बंधनकारक आहे, मात्र हे प्रतिनिधी नेमले आहेत की नाहीत, याबाबतची माहिती कुणालाच नाही. जरी प्रतिनिधी घेतले असले तरी त्यांची कर्तव्ये कोणती, प्रतिनिधींना कोणत्या निकषाखाली नियुक्त केले आहे, हेच शेतकऱ्यांना माहित नाही. प्रत्येक साखर कारखाना व कारखाना कार्यालयात शेतकरी प्रतिनिधींच्या नावाचा फलक कोठेही दिसून येत नाही. याशिवाय साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत शेतकरी प्रतिनिधी व्यासपीठावर दिसत नाहीत किंवा सभेवेळी त्यांचे नाव देखील घेतले जात नाही.

  मुळात सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ शेतकऱ्यांचे विश्वस्त म्हणून काम करत असते. असे असताना शेतकरी प्रतिनिधी हवेतच कशाला ? यापूर्वी संचालक मंडळात असणारे कामगार प्रतिनिधी पद बहुतांशी कारखान्यांनी मोडीत काढले आहे. शिल्लक फक्त तज्ज्ञ संचालक नियुक्त केले जातात. ते देखील सगेसोयरेच असतात. आजवर कारखान्यावर नियुक्त असलेल्या तज्ज्ञ संचालकाच्या माध्यमातून साखर कारखान्यास नेमका कसा लाभ होत आहे, हा देखील संशोधनाचा विषय ठरला आहे.

  प्रतिनिधींची निवड कशी ?

  साखर कारखान्यांच्या वजनकाटा तपासणी वेळी काटा अचूक आहे. या वैद्यमापन विभागाने तपासणी केलेल्या कागदपत्रावर शेतकरी प्रतिनिधींच्या सह्या असल्याचे काही वेळा दिसून आले आहे. परंतु शेतकऱ्यांना हे प्रतिनिधी कशा पद्धतीने निवडले याची माहिती मात्र नाही. प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेतकरी सभासदात विचारणा केली तर त्यांना देखील आपल्या कारखान्याचे शेतकरी प्रतिनिधी कोण आहेत. त्यांची नावे सांगता येत नाहीत.

  जनजागृती करण्याची गरज

  नवीन सहकार कायद्यानुसार शेतकरी प्रतिनिधी यांची कर्तव्ये काय आहेत आणि त्यांना नियुक्त करण्याची पद्धत कशी आहे. प्रत्येक कारखान्याचे शेतकरी प्रतिनिधी कोण आहेत, याची माहिती शेतकरी सभासदांना देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे.