शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण बी बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करुन द्यावेत – कृषीमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण बी बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उत्पादक कंपनी व कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी उत्पादक कंपनी व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी त्यांची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले

  पंढरपूर : शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण बी बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उत्पादक कंपनी व कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी उत्पादक कंपनी व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी त्यांची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले

  श्री. विठ्ठल-रुक्मिणी पॅलेस, पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी निविष्ठा विक्रेते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषीमंत्री श्री मुंडे बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, साखर कारखान्याचे चेअरमन वसंत काळे, कृषी संचालक विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, कृषी निविष्ठा विक्रेते संघ महाराष्ट्र अध्यक्ष विनोद तराळ-पाटील, महासचिव विपीन कासलीवाल तसेच राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यावेळी कृषीमंत्री मुंडे म्हणाले, राज्यशासनाला जशी शेतकऱ्यांची काळजी आहे तशीच कृषी निविष्ठा विक्रेत्यांची देखील आहे.राज्यात बरेच कृषी निविष्ठा विक्रेते हे शेतकऱ्यांचीच मुले आहेत. खते, बियाणे, कीटकनाशके यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल. बी-बियाणे, खते व किटकनाशकांची कृत्रीम टंचाई निर्माण करणाऱ्या तसेच एखाद्या कृषी उत्पादनासोबत शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे उत्पादन घेण्याची सक्ती करु नये. उत्पादक कंपनीच्या केाणत्याही दबावाला विक्रेत्यांनी बळी पडू नये. तसेच बोगस बी-बियाणे, खते व किटकनाशकांची विक्री करु नये,याबाबत कृषी विभागाने जबाबदारीने काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खते व किटकनाशकांची उपलब्धता व्हावी यासाठी बार कोड पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये खरेदी करण्यात आलेल्या निविष्ठांची माहिती शेतकरी, कृषी निविष्ठा विक्रेते तसेच कृषी विभागालाही कळणार आहे. निविष्ठांबाबतचे नवे कायदे तर झालेच पाहिजे. परंतु त्यांची अंमलबजावणी करताना एकाही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नाही आणि एकही दोषी कारवाई वाचून सुटणार नाही . भविष्यात कृषी निविष्ठा सुधारणा कायदा अंमलात आला तरी याचा फायदा शेतकऱ्यासह कृषी निविष्ठा विक्रेत्यांना होणार आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांना विश्वासात घेवूनच हा कायदा लागू करण्यात येईल असेही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच कृषी निविष्ठा सुधारणा विधेयक २०२३ सादर करण्यात आले. परंतु या कायद्यान्वये कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

  यावेळी माजी आमदार दिपक सांळुखे-पाटील म्हणाले,राज्यात शेतकरी महत्वाचा घटक आहे. शेतकरी अडचणीत येवू नये त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी कृषी निविष्ठा विकेत्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी समजून योग्य मार्ग काढावा.

  विक्रेते निविष्ठा अधिकृत उत्पादकांकडून खरेदी करून त्यांच्या मूळ पॅकिंमध्येच शेतकऱ्यांना विकत असल्यामुळे ती उत्पादने अप्रमाणित ठरल्यास किंवा त्या उत्पादनापासून शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास त्यासाठी विक्रेत्यांना जबाबदार धरू नये. तर कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी यावेळी केली.