Farmers should register till May 17 for purchase of gram at minimum basic price - Appeal of Co-operation Minister

चालू वर्षी राज्यात हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तथापि बाजारभाव मात्र हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी आणि राज्याला दिलेले हरभरा (चना) खरेदीचे उद्दिष्ट ६.८९ लाख टन पूर्ण करण्यासाठी सर्व राज्य नाफेड संस्थानी प्रयत्न करावेत.

  मुंबई : किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतक-यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत ५०. ८४ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी १७ मे पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतक-यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

  आज मंत्रालयात हंगाम २०२१ – २२ मधील हरभरा (चणा) खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत चना खरेदी संदर्भातील आढावा घेतला व शेतक-यांसाठी नोंदणीची तारीख वाढवावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, पणनचे सहसंचालक विनायक कोकरे , द विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, महाफपीसी पुणे चे योगेश थोरात यांच्यासह पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भाग्यश्री टिळेकर, विदर्भ ॲग्रीकल्चरल अलाईड प्रोड्युसर कंपनी(वॅपको) नागपुर नाफेडचे पुनीतसिंग, भारतीय अन्न महामंडळ अंशुमन चक्रवर्ती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  सहकार  व पणन मंत्री श्री.पाटील 

  चालू वर्षी राज्यात हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तथापि बाजारभाव मात्र हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी आणि राज्याला दिलेले हरभरा (चना) खरेदीचे उद्दिष्ट ६.८९ लाख टन पूर्ण करण्यासाठी सर्व राज्य नाफेड संस्थानी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे खरेदी केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करावे. खरेदी केलेले शेतमाल गोदामात लवकर जमा करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात यावेत. यासाठी व्यवस्थापकीय संचालक, पणन महासंघ मुंबई यांनी नाफेड व भारतीय अन्न महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत.

  शेतकरी चुकाऱ्यांबरोबर हमालीचे पैसे अनुषंगिक खर्च व बारदाण्याचे पैसेही नाफेडने लवकर अदा करावे, अशा सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अशी सूचना केली. राज्यातील चना खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित मंडळांच्या अधिका-यांना दिल्या.

  हरभरा ५२३० प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत असून, दिनांक १ मार्च पासून ७३० खरेदी केंद्रांवर हरभरा (चना ) खरेदी सुरू करण्यात आला आहे. आजतागायत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. ५०.८४ लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. २ लाख ८० हजार २८४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत २६५८.९३ कोटी असून, १९५८.४० कोटी निधी शेतक-यांना वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी अधिका-यांनी दिली.