संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत तासगांव तालुक्याच्या पुर्वभागातील शेतकरी टँकरने पाणी घालून द्राक्षबागा जगवण्यासाठी धडपडत आहे. या विदारक परीस्थितीने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला असल्याचे भयानक चित्र तालुक्यात दिसत आहे.

  तासगांव : दुष्काळ नावाचा राक्षस तासगांव तालुक्याच्या पुर्वभागातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत तासगांव तालुक्याच्या पुर्वभागातील शेतकरी टँकरने पाणी घालून द्राक्षबागा जगवण्यासाठी धडपडत आहे. या विदारक परीस्थितीने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला असल्याचे भयानक चित्र तालुक्यात दिसत आहे.

  निसर्गाची अवकृपा आणि लोकप्रतिनिधींची असंवेदनशीलता याच्या कचाट्यात तालुक्यातील शेतकरी अक्षरशः भरडला जात आहे. गेली कित्येक वर्षे तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याच्या घोषणा प्रत्येक भाषणात ऐकवल्या गेल्या. निवडणुकांच्या तोंडावर सिंचन योजनांचे नारळ फुटले. अपवादाने काही भागातील पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी मार्गी लागल्याचे दिसते आहे.

  परंतु तालुक्यातील सर्वाधिक द्राक्षशेती असलेल्या सावळज पुर्वभागातील शेतीच्या पाण्याची परीस्थिती अत्यंत गंभीर आहे. काही ठरावीक शेतकऱ्यांनी म्हैशाळ योजनेच्या गव्हाण उपसा सिंचन प्रकल्पातुन लाखो रुपये खर्च करुन पाईपलाईने पाणी आणुन द्राक्षबागा जगवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु छोट्या शेतकऱ्यांना ते पाणी आणणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तर दुसरीकडे सिध्देवाडी तलाव व अग्रणी नदीच्या बाजुला असलेल्या शेतकऱ्यांना मात्र पाण्यासाठी अद्यापही टँकरवर अवलंबून रहावे लागते ही वस्तूस्थिती आहे.

  सध्या तासगांव तालुक्यातील द्राक्षबागांचा हंगाम जवळपास संपला आहे. काही ठिकाणची द्राक्षे काढणी सुरु झाली आहे. परंतु बहुतांश भागात पाण्याआभावी अद्यापही द्राक्षबागांच्या खरड छाटण्या बाकी आहेत. सध्या द्राक्षपीकाला पाण्याची नितांत गरज आहे. एप्रिल महीना सुरु झाल्यामुळें वातावरणात उष्णता वाढली आहे. परीणामी बागाना पाण्याची जास्त आवश्यकता आहे. गव्हाण मधुन म्हैसाळ योजनेच्या बंधाऱ्यातुन टँकरने पाणी घालण्याची धडपड सावळज व परीसरात दिसुन येत आहे.

  तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या डोंगरसोनी गावातील पाण्याचे एवढे दुर्भिक्ष्य आहे की पाण्याअभावी गावातील ६० % बागांची पीक छाटणीच शेतकऱ्यांनी घेतली नाही. ज्या द्राक्षबागा सध्यस्थितीत आहेत त्यांना सरार्स टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 3000 ते 3500 रूपये प्रति टँकर दराने शेतकरी पाणी विकत घेतो आहे.

  दरम्यान तालुक्यात टेंभु, आरफळ, म्हैसाळ योजनेचे पाणी काही भागात दाखल झाले आहे. टेंभुच्या ५ व्या ट्प्प्यातुन सिध्देवाडी तलावातही थोड्याच दिवसात पाणी सोडण्यात येणार असल्याचे राजकीय व्यासपीठावरुन ऐकायला मिळत आहे. सिध्देवाडी तलावात पाणी आणुन तेच पाणी अग्रणी नदीला सोडण्याचे नियोजन असल्याचे संबंधित अधिकारी व पदाधिकारी सांगत आहेत. सध्यातरी सर्वच शेतकरी पाण्याची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत. हक्काचे व कायमस्वरूपी पाणी मिळावे हीच एकमेव मागणी तालुक्यातील पुर्वभागाच्या शेतकऱ्यांची आहे.

  टँकरने पाणी घालून बागा जगवणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. परंतु नाईलाजाने का होईना टेंभुच्या पाण्याच्या आशेने शेतकरी बागा जगवण्यासाठी धडपडत आहे. लोकप्रतिनिधींनी राजकीय ताकद लावुन ह्या योजना तडीस न्यावे हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांकडून त्याबाबत मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. पण प्रत्यक्षात मात्र पाण्याचा थेंबही पूर्वभागाला अद्याप मिळाला नाही.

  दरम्यान टेंभुच्या प्रस्तावित पाणी यायला अजुन थोडाफार अवधी आहे. तोपर्यंत पुणदी योजनेतुन सावळजच्या अग्रणी नदीत पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पैसेही जमा केले आहेत. संबंधित विभागाने या भागातील पाण्याची भीषण टंचाई प्रामुख्याने लक्षात घेवुन पुणदी योजनेचे पाणी सावळज परीसराला तातडीने द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

  शासनाकडून दुष्काळ जाहीर होवुन जवळपास 3 महीने झाले. तासगांव तालुक्यात मात्र दुष्काळी उपाययोजना अद्यापही सुरु झाल्या नाहीत. चाऱ्याअभावी मुक्या जनावरांची तडफड होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त भागात कोणतीही कामे सुरु नाहीत. गावागावांत पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे. शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष घालावे ही मागणी वाढत आहेत. परंतु प्रशासन मात्र लोकसभा निवडणुकीच्या नियोजनात व्यस्त आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.