शेतकऱ्यांनो स्वतःच पिकाची नोंद करा थेट शासन दरबारी; तहसीलदार रवींद्र रांजणे यांचे आवाहन

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

    तासगाव : शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांची अचूक नोंद शासनाकडे (Goverment) करता यावी. या उद्देशाने गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलातून शेतकऱ्यांना हे अ‍ॅप अधिक सोपे आणि सहज लक्षात येईल, असे बनवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनो आपल्या पिकाची नोंद आता स्वता:च थेट शासन दरबारी करा, असे आवाहन तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी केले.
     शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतात जाऊन ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षीच्या अ‍ॅपमध्ये सुधारणा करून आता मोबाईल अ‍ॅप २.० खरीप हंगामातील पीक नोंदणीसाठी सज्ज झाले आहे.
    पिकांची अचूक नोंद शासनाकडे करता यावी. या उद्देशाने गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलातून शेतकऱ्यांना हे अ‍ॅप अधिक सोपे आणि सहज लक्षात येईल, असे बनवण्यात आले आहे. ई- पीक पाहणीचे नवीन सोपे व्हर्जन तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीत दुरुस्ती देखील करता येणार आहे. खरीप हंगाम २०२२-२३ ची ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वीच्या अ‍ॅपमध्ये शेतकऱ्यांच्या सूचनांच्या आधारे महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत असे मोबाईल अ‍ॅप २.०  व्हर्जन विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
    या महिन्यात अ‍ॅपद्वारे ई-पीक नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पीक पाहणी नोंदवल्यापासून ४८ तासांमध्ये त्यात स्वतःहून एकदा दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे. यापूर्वी मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा होती. मात्र, या सुधारित अ‍ॅपमध्ये एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांची नोंदणी करता येणार आहे. इतकेच नव्हे, तर या दुय्यम पिकाचा हंगाम, तारीख व पीक क्षेत्र यात नोंदविता येणार आहे.
    तासगाव तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्व सरपंच, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, सर्व कृषि सहायक, सर्व पोलीस पाटील, सर्व सेतू महा ई सेवा संचालक, सर्व स्वस्त धान्य दुकानदार, सर्व तरुण व सामाजिक मंडळे यांना निर्देशित करण्यात येते की “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा” अंतर्गत दिनांक १५/०९/२०२२ पासून ३०/०९/२०२२ पर्यत तासगांव तालुक्यामधील सर्व शेतकरी यांचे पिकांची नोंद ई पिक पाहणी अॅप मध्ये नोंदविणेची आहे. त्यानुसार तासगाव तालुक्यतील जास्तीत जास्त शेतकरी यांनी ई पिक पाहणी पुर्ण करावे. त्यानुसार आपले कार्यक्षेत्रातील शेतकरी यांचे बांधावर जाऊन ई पिक. पाहणी अॅपमध्ये पिकांची नोंदणी करणेबाबत जागृत करावे व आपण स्वतः सक्रीय सहभाग घेऊन, जास्तीत जास्त शेतकरी यांचे पिकांची नोंदणी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन रविंद्र रांजणे यांनी केले.