rain

येत्या 24 तासात राज्यातील काही ठीकाणी पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. 

    मुंबई : राज्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. राज्यात अनेक ठिकणी रिमझिम तर काही भागात विजांच्या कडकडाटासह एक तास पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारंबळ उडाली. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या 24 तासात राज्यातील काही ठीकाणी पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे.

    14 डिसेंबर (बुधवारी) राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून, वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्यामध्ये वाशिम, नंदुरबार, बुलढाणा, हिंगोली, रायगड, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

    बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते. तर, काल जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुलढाणा शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचे रब्बी पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.

    काल वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाने धुमाकूळ घातला. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री उशिरा अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाशिममध्ये सलग दोन दिवसापासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना धोका वाढला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आधीच पीक संकटात आल्यानंतर आता त्यामध्ये अवकाळी पावसाची भर पडली आहे.

    दरम्यान, राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शहादा परिसरामध्ये काल जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील केळी, मिरची, कापूस आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.