धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण बारामतीत सुरु ; आंदोलक चंद्रकांत वाघमोडे यांचा मागे न हटण्याचा निर्धार

गेल्या दोन महिन्यापूर्वी चोंडी येथे बसलेल्या धनगर समाजातील उपोषणकर्त्यांना एस . टी आरक्षणाची अंमलबजावणी करू ,असे आश्वासन दिले.१५नोव्हेंबर रोजी आश्वासनाची मुदत संपत आहे ,परंतु आजपर्यंत सरकार कडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. म्हणून दि ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी एक वाजता बारामती प्रशासकीय भवन समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे

    बारामती : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एस. टी)समावेश व्हावा, या मागणीसाठी धनगर समाजाने बारामतीतून निर्णायक लढ्याची हाक देत आंदोलन सुरू केले आहे. चंद्रकांत वाघमोडे या तरुण कार्यकर्त्याने आमरण उपोषणास सुरुवात केली आहे, धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले एसटी आरक्षण तात्काळ लागू करावे, अन्यथा आपण आंदोलन मागे घेणार नसल्याची आक्रमक भूमिका वाघमोडे यांनी घेतले असून, त्यांच्या या निर्णय आंदोलनाला धनगर समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे. ९ नोव्हेंबर रोजी चंद्रकांत वाघमोडे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे .

    महाराष्ट्रातील धनगर समाज मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली ,अनेक मोर्चे झाले आणि उपोषणे झाले ;तरी सुद्धा सर्वच सत्ताधारी काँग्रेस,भाजप,राष्ट्रवादी,शिवसेना या पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे .जे सरकार सत्तेच्या बाहेर असते, तेव्हा ते सरकार धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणते,तेच सरकार धनगर समाजाच्या मतावर सत्तेत बसते, तेव्हा ते सरकार मुग गिळून गप्प बसते. यामुळे समाजात असंतोष पसरला असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

    गेल्या दोन महिन्यापूर्वी चोंडी येथे बसलेल्या धनगर समाजातील उपोषणकर्त्यांना एस . टी आरक्षणाची अंमलबजावणी करू ,असे आश्वासन दिले.१५नोव्हेंबर रोजी आश्वासनाची मुदत संपत आहे ,परंतु आजपर्यंत सरकार कडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. म्हणून दि ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी एक वाजता बारामती प्रशासकीय भवन समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे ,याची सरकारने व प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

    यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफने, अविनाश देवकाते, दशरथ राऊत, पोपट धवडे, देवकाते सर, रोहन कोकरे, बापूराव सोलनकर, अमोल सातकर ,विठ्ठल देवकाते, नवनाथ मलगुंडे इत्यादी उपस्थित होते.