धनगर समाजाच्या आरक्षणासाठी म्हसवड नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण; जयंत पाटलांची उपोषणस्थळी भेट

धनगर समाजाला घटनेने दिलेले एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी या समाजाच्या तरुणांनी मागील ११ दिवसांपासून म्हसवड नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील याठिकाणी आले होते.

    म्हसवड : धनगर समाजाला घटनेने दिलेले एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी या समाजाच्या तरुणांनी मागील ११ दिवसांपासून म्हसवड नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील याठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या या उपोषणाला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगत या समाजाचा प्रश्न थेट विधानसभेत मांडणार असल्याचे स्पष्ट केले.

    धनगर समाजाला एसटीचे आरक्षण हे राज्यघटनेने दिलेले आहे. मात्र, राज्य शासन ते आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे. घटनेने जे आरक्षण दिले, त्यामध्ये धनगड असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. वास्तविक, राज्यात सर्वत्र धनगर अस्तित्वात आहेत धनगड ही जमात कोठेही आढळून आलेली नाही. त्यामुळे धनगर व धनगड ही एकच जमात असल्याचे गृहीत धरुन त्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे करावयाची आहे.

    मात्र, ही शिफारस करण्यासाठी राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप धनगर समाजाकडून करण्यात येत असून, राज्य सरकारने ही शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजाच्या उत्तम वीरकर व गणेश केसकर या युवकांनी म्हसवड येथे गत ११ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या उपोषणाला आजवर अनेक मान्यवरांनी व सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

    आजवर धनगर समाजाची फक्त दिशाभूल करण्यात आल्याचे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले. तर आपण धनगर समाजाचा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे स्पष्ट करताना आ. पाटील म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की सत्ताधाऱ्यांना धनगर समाज आठवतो. मात्र, या समाजाच्या अडीअडचणी कधीच सोडवल्या गेल्या नाहीत. याबाबत आपण पक्षश्रेष्ठी असलेले पवार साहेब यांच्याशी चर्चा करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत धनगर समाजाचे प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले.