अनेक गावांत बिबट्यामुळे भिती; जनावरांवरील हल्ल्यामुळे शेतकरी चिंतेत

पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गावागावांमध्ये गेले काही दिवस बिबट्याचा वावर वाढल्याने त्या त्या भा्गात भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांना यामुळे दहशतीखाली रहावे लागत आहे.

    पुणे : पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गावागावांमध्ये गेले काही दिवस बिबट्याचा वावर वाढल्याने त्या त्या भा्गात भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांना यामुळे दहशतीखाली रहावे लागत आहे. बिबट्याकडून काही ठिकाणी गाेठ्यात असलेल्या जनावरांवर हल्ला हाेत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. वनखात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन पिंजरा तातडीने पिंजरा लावण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी हाेत आहे.

    पोंदेवाडी (ता. आंबेगाव) व सविंदणे (ता. शिरूर) गावच्या हद्दीवर असलेल्या काळूबाई मंदिर रस्त्यावर शुक्रवारी (ता. ८) रात्री बिबट्याची जोडी फिरताना दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावच्या हद्दीवर असलेल्या काळूबाई मंदिर परिसरातील शिवरस्त्यावरून शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बाबाजी ज्ञानेश्वर नरवडे हे चारचाकी वाहनातून शेतातील घराकडे चालले हाेते. त्यावेळी त्यांना रस्त्यात बिबट्याची नर-मादीची जोडी आडवी गेली. जवळजवळ सात ते आठ मिनटे बिबट्याची जोडी रस्त्याच्या कडेला डरकाळी फोडत फिरत होती. परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला हाेता. बिबट्याच्या जोडीचा वावर असल्याने नागरिक चिंतेत आहेत.

    खोडद (ता. जुन्नर) येथे भरवस्तीत बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरातील नागरिक तणावाखाली आहेत. शुक्रवारी (ता. ८) मध्यरात्री ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांना बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसला. वनविभागाने तातडीने या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

    शुक्रवारी मध्यरात्री ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते किरण गायकवाड, प्रसाद बोरसे, नीलेश गुगळे, अभिषेक बेल्हेकर, आदित्य चौधरी, आकाश चौधरी, मंगेश जाधव, ऋषिकेश हांडे, मिलिंद घुले, तुषार आंधळे, मंगेश जाधव हे खोडदमध्ये गस्त घालत होते. रात्री सुमारे साडेबाराच्या सुमारास बिबट्या मध्यवस्तीतून आला. येथील ग्रामपंचायतीच्या आवारात काही वेळ हा बिबट्या थांबला. या वेळी परिसरातील कुत्री भूंकायला लागल्याने बिबट्या निघून गेल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.