सराफाला इन्कम टॅक्सच्या रेडची भीती दाखवत सोने लंपास; व्यवस्थापकानेच केला गेम

सराफी दुकानावर इन्कम टॅक्स विभागाची रेड पडेल अशी भीती दाखवत दुकानातील व्यवस्थापकनेच 5 किलो सोने, 50 किलो चांदी आणि रोख रक्कम असा सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल पळविल्याची घटना उघडकीस आली आहे.

    पुणे : सराफी दुकानावर इन्कम टॅक्स विभागाची रेड पडेल अशी भीती दाखवत दुकानातील व्यवस्थापकनेच 5 किलो सोने, 50 किलो चांदी आणि रोख रक्कम असा सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान हे दुकान मुंबईत कर्तव्यास असलेल्या सहाय्यक आयुक्तांच्या मुलाचे आहे.

    याप्रकरणी व्यवस्थापक विनोद रमेश कुलकर्णी (वय-35, रा. लोणीकाळभोर) असे गुन्हा दाखल आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी ज्योतीरादित्य उर्फ यश राजेंद्र मोकाशी (वय 22, रा. निलगीरी लेन, बाणेर रोड, औंध) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 12 मार्च 2022 ते 8 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तक्रारदार ज्योतिरादित्य मोकाशी यांनी दोन वर्षांपूर्वी माळवाडी रोडवरील शिवनेरी बिल्डिंगमध्ये वसुंधरा ज्वेलर्स नावाने सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान सुरु केले. दुकानात आरोपी विनोद व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्यावेळी वसुंधरा ज्वेलर्स मध्ये 5 किलो सोने,85 किलो चांदी ही दागदागिण्यासाठी घेतली होती. हे सगळे सोने, चांदी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांना देऊन मोकाशी हे एम. एस. चे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे निघून गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते डिसेंबर 2023 मध्ये पुण्यात आले. त्यांनी वसुंधरा ज्वेलर्सचे कामकाज पाहायला सुरुवात केली व विनोद कुलकर्णी आणि इतर स्टाफकडून माहिती घेतली. तेव्हा मोकाशी यांच्या लक्षात आले की, दुकान सुरु करताना 5 किलो सोने व 85 किलो चांदी घेतली होती. यापैकी पावणेतीन किलो सोने व ५० किलो चांदी कमी आहे. कमी असलेले सोने व चांदी दुकानात नव्हती. यानंतर मोकाशी यांनी ही बाब त्यांच्या वडिलांना सांगितली. वडिलांनी सोने, चांदी कमी असल्याबाबत विनोद याच्याकडे विचारणा केली. त्याने 7 फेब्रुवारीला उद्या सर्व सोने परत देतो आणि हिशोब पूर्ण देतो, असे सांगून निघून गेला.

    8 फेब्रुवारी रोजी विनोदने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वसुधंरा ज्वेलर्स मधील कामगाराला फोन करून सांगितले की, दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे व मालकाला हिशोब द्यायचा आहे. त्यासाठी सोने, चांदी तयार ठेव. यानंतर साडे दहा वाजता एक गाडी आली. कामगारांनी दुकानातील सोने, चांदी देऊन टाकली व विनोदने सांगितल्याप्रमाणे दुकान बंद केले. दुकानातील व्यवस्थापक विनोद याच्याकडे सोपवलेले 5 किलो सोने व 50 किलो चांदी आणि रोख रक्कम अशी 2 कोटी 27 लाखांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे करत आहेत.