तीनशे रुपयांची लाच स्वीकारणं पडलं महागात; महापालिकेच्या महिला लिपिकाला रंगेहाथ पकडलं

'आरटीई'तून प्रवेश मिळालेल्या एका मुलाच्या पालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करून तीनशे रुपये घेताना महापालिका शिक्षण मंडळातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले.

    सोलापूर : ‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या एका मुलाच्या पालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करून तीनशे रुपये घेताना महापालिका (Solapur Municipal Corporation) शिक्षण मंडळातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले.

    प्रभावती अंबादास वईटला (कस्सा) असे त्या महिला लिपिकाचे नाव असल्याची माहिती लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिली. ५८ वर्षीय महिला लिपिकाने बक्षीस स्वरूपात ही रक्कम स्वीकारली होती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत २५ टक्के मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. आरटीईअंतर्गत नंबर लागलेल्या मुलांचे प्रवेश सध्या सुरु असून, तक्रारदाराच्या मुलाचा ‘आरटीई’तून नंबर लागला होता. त्याचे प्रवेशपत्र दिल्यानंतर बक्षीस म्हणून पाचशे रुपयांची मागणी केली होती. तेवढे पैसे नसल्याने त्या महिला लिपिकाने तक्रारदाराकडून तीनशे रुपये घेतले.

    त्यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई स्वप्निल सणके, प्रफुल्ल जानराव, अतुल घाटगे, शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी यांच्या पथकाने केली.