विज बिल थकल्याने वीज मीटर कापण्यास आलेले महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    कल्याण : दोन महिन्यांचे सहा हजार रुपये वीज बिल थकल्याने वीज मीटर कापण्यास गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याना भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व काटे मानवली परिसरात घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय.

    कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे त्यांचे पती कैलास पावशे व कुटुंब राहते. त्यांच्या घराचे सहा हजार रुपये वीज बिल थकबाकी होते. दोन महिन्यांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिल भरण्यासाठी त्यांना सांगितले होते. मात्र थकीत बिलाचा भरणा न केल्याने आज दुपारच्या सुमारास महावितरणचे पथक पावशे यांच्या घरी वीज मीटर कट करण्यासाठी गेले. कारवाई करत मीटर कट केला असता त्या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे या पोहोचल्या. त्यांनी या महावितरणच्या पथकातील महिला कर्मचारी पल्लवी टोळे, प्रियस्वी पडवळ यांना शिविगाळ करत बेदम मारहाण केली. हेमलता पावशे यांचे पती कैलास पावशे देखील त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतले. घडलेला घटनेबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस हेल्पलाइनवर फोन करून माहिती दिली कोळसेवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत याप्रकरणी पुढील तपास सुरू केलाय