खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करावा : वासुदेव काळे

खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करून माती व पाणी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करून माती व पाणी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे (Vasudev Kale) यांनी केले.

    स्मार्टकेम टेक्नॉलॉजी लिमिटेड, पुणे महाधन व सोनाली फर्टीलायझर्स, मानकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून काळे बोलत होते. यावेळी वासुदेव काळे म्हणाले, खत कंपन्यानी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून माती व पाणी परीक्षणासाठी शेतकऱ्याला प्रशिक्षित करावे. अनेक वर्ष शेतकऱ्याला हक्काचे मार्केट मिळाले नाही. केंद्र सरकारने भाजपच्या एस.एम.पी प्रमाणेच एफआरपी सुध्दा बंधनकारक केल्यामुळे साखर कारखान्यांचा व शेतकऱ्यांचा फायदा झाला.

    कृषी क्षेत्रातील विमा कंपन्या तसेच इतर कंपन्यांनी नेहमी शेतकरी हिताचा विचार करावा. कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी आधुनिक संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना सातत्याने देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाच्या योजनांची माहिती कंपन्यांनी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करून याठिकाणी आयोजित केलेला ऊस पीक परिसंवाद हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे वासुदेव काळे यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी ऊस पिकावर खत व्यवस्थापन याविषयी महाधन कंपनीचे सोनल मार्केटिंग मॅनेजर व ऊस तज्ञ बिपिन चोरगे यांनी यावेळी योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी खते कशी द्यावीत, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाधन क्राॅपटेक हे शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे योग्य संतुलित ऊस पीकाचा आहार आहे, याची सविस्तर माहिती यावेळी दिली.