अखेर पाणीपुरवठा विभागासाठी सल्लागार म्हणून निवृत्त अधिकारी प्रवीण लडकत नियुक्त

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासाठी सल्लागार म्हणून निवृत्त अधिकारी प्रवीण लडकत हे नुकतेच रूजू झाले आहेत. त्यांच्याकडे आंद्रा व भामा आसखेड धरण पाणी प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची सल्लागारपदी ११ महिन्यांसाठी मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासाठी सल्लागार म्हणून निवृत्त अधिकारी प्रवीण लडकत हे नुकतेच रूजू झाले आहेत. त्यांच्याकडे आंद्रा व भामा आसखेड धरण पाणी प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची सल्लागारपदी ११ महिन्यांसाठी मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते नुकतेच रूजू झाले आहेत.

    प्रवीण लडकत हे २८ फेब्रुवारी २०२२ ला सेवानिवृत्त झाले. पाणीपुरवठा विभागातील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन महापालिकेने सल्लागार पदासाठी १६ मार्चला जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यात पाणीपुरवठा विभागासाठी असा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यासाठी २१ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले. पात्रता, अटी व अनुभवानुसार लडकत यांचा एकमेव अर्ज या पदासाठी प्राप्त झाला.

    लडकत यांना सल्लागार म्हणून मानधनावर नियुक्त करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अण्णा बनसोडे यांनी निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा मानधनावर कामावर घेण्याची प्रथा अयोग्य असल्याचे सांगत त्याला विरोध दर्शविला होता. अशी परिस्थिती असतानाही या नियुक्तीस आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी ७ एप्रिलला मंजुरी दिली.