जिल्हा बँकेकडून मयत खातेदाराच्या वारसास मिळाला मदतीचा हात; अपघात विमा कामी

आज जी दुटाळ कुटुंबावर वेळ आली आहे, ती कोणावरही येऊ नये. सध्या धावपळीच्या जीवनात कोणाचेही काहीही सांगता येत नाही. हे कोरोनाने सर्वांना शिकवले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कसं होणार याची चिंता भेडसावत असते.

    मेढा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Satara District Bank) खातेदार असलेले व हनुमान विकास सोसायटी आलेवाडीचे सभासद शंकर जगन्नाथ दुटाळ यांचे अपघाती निधन झाले. त्यांनी जिल्हा बँकेकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून दोन लाखांचा विमा काढला होता. आता त्यांच्या पश्चात या विम्याचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला.

    विभागीय विकास अधिकारी आण्णासाहेब फरांदे यांनी मयत खातेदाराच्या वारस असलेल्या सारिका शंकर दुटाळ यांच्याकडे दोन लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी आण्णासाहेब फरांदे म्हणाले, आज जी दुटाळ कुटुंबावर वेळ आली आहे, ती कोणावरही येऊ नये. सध्या धावपळीच्या जीवनात कोणाचेही काहीही सांगता येत नाही. हे कोरोनाने सर्वांना शिकवले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कसं होणार याची चिंता भेडसावत असते. त्यामुळे बँकेचे सर्व खातेदार, शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून विमा काढला तर आपल्यानंतरही आपल्या कुटुंबास आपण मदत करू शकतो.

    त्यादरम्यान प्रतापगड साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भिलारे, वसुली अधिकारी निकम, विकास अधिकारी झोरे, कर्तव्यदक्ष शाखाप्रमुख गुरव, अनिल पवार, अमोल सुतार, यशवंत पवार, गणेश वंजारी, सुनिल महामूलकर व बँक शाखा कर्मचारी व खातेदार उपस्थित होते.