
मात्र अन्य प्रकरणात दोषी असल्याने कारागृहात रहावे लागणार
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी सरदार खानला विशेष न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. मात्र, साल १९९३ साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातही दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात जामीन मिळूनही खानला कारागृहातच राहावे लागणार आहे.
कुर्ला येथील जागेसंदर्भात दाऊद याची बहीण हसीन पारकरसोबत करार करण्यासाठी खाननेच नवाब मलिक यांना मदत केली होती, असा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आरोप आहे. दरम्यान, ईडीने खानला या प्रकरणात अटक केलेली नाही. त्यामुळे त्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ८८ अन्वये जामिनाची मागणी केली होती. या कलमानुसार, आरोपीला बंधपत्रावर सोडण्याचा अधिकार न्यायालयाला असल्याने याच कलमांतर्गत विशेष न्यायालयाने खानला या प्रकरणी जामीन मंजूर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकही दाऊदच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असून अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.