तलाठी भरती घोटाळ्याचा मास्टरमाईंड शोधा, नाहीतर…; ठाकरे गटाचा सरकारला इशारा

तलाठी भरती परीक्षेचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. यावरुनच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. तसेच ही परिक्षा रद्द करुन नव्याने पारदर्शक परीक्षा घेण्याची मोठी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

    पुणे : तलाठी भरती परीक्षेचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. यावरुनच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. तसेच ही परिक्षा रद्द करुन नव्याने पारदर्शक परीक्षा घेण्याची मोठी मागणी ठाकरे गटाने केली आहे.
    तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ही तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याचाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
    तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती. या तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही परीक्षा आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल तर मग गुन्हे कसे दाखल झाले ? याचे उत्तर सरकारने द्यावे, असे कैलास पाटील म्हणालेत.
    सरकार या सगळ्या प्रकरणात पुरावे विद्यार्थ्यांकडून मागत आहेत हे चुकीचे असून सरकारने ही जबाबदारी घेऊन या सगळ्या मागचा मास्टरमाईंड समोर आणावा, ही आमची मागणी आहे. ही सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून राब्याने तलाठी भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची आता सरकारकडे विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी राहील. असेही पाटील म्हणालेत.