बनावट कागदपत्रे तयार करून जामीनदार उभा करणे भोवले; दोघांवर गुन्हा दाखल

    पुणे : शिवाजीनगर न्यायालयात जामिनासाठी जामीनदाराचे आधारकार्ड आणि ७/१२ उतारा ही बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश उमेश सूर्यवंशी (वय २९, रा. सुष्टी चौक, पिंपळे गुरव), सूर्यवंशी (संपूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा नोंद केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश प्रकाश अंबुरे (वय ३८, रा. कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना १२ एप्रिलला सायंकाळी साडे पाचदरम्यान घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव पवन झंवर याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. झंवरला जामीन मिळविण्यास त्याचा भाऊ प्रयत्नशील होता. त्याला न्यायालयात सूर्यवंशी भेटला आणि त्याने योगेश सूर्यवंशी यांचे नाव व नंबर दिला. यानंतर शिवच्या भावाने योगेश सूर्यवंशीशी संपर्क करून भावाला जामीन राहणार का अशी विचारणा केली. यानंतर शिव याच्या वकिलांनी योगेश सूर्यवंशीला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी जामीनदार योगेश सूर्यवंशीने आपले नाव शंकर भिकू राठोड असल्याचे बिराजदार यांना सांगितले.

    यानंतर न्यायालयाने या जामीनदाराची माहिती सीआयएस प्रणामी आणि समक्ष चौकशी केली असता जमीनदाराचे नाव शंकर भिकू राठोड नसून योगेश उमेश सूर्यवंशी असल्याचे समोर आले. योगेश सूर्यवंशी याने शंकर राठोड नावाचे बनावट आधारकार्ड आणि ७/१२ उतारा तयार केला. योगेश सूर्यवंशीला अटक करून न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने करत आहेत.