‘तुझ्या मुलीला उचलून नेईन अन् तू…’; ऑडिओ मेसेज पाठवणाऱ्या ‘त्या’ तरूणाविरोधात गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्याचा मैत्रीचा प्रस्ताव तिने नाकारला. त्यामुळे चिडलेल्या त्याने तिच्या फोटोसोबत स्वःताचा फोटो जोडून तिच्या वडिलांना पाठवला व तुझ्या मुलीला उचलून नेईन, तू काहीच करू शकणार नाही, असा व्हॉईस मॅसेज केल्याची घटना सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौराह परिसरात घडली.

    छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्याचा मैत्रीचा प्रस्ताव तिने नाकारला. त्यामुळे चिडलेल्या त्याने तिच्या फोटोसोबत स्वःताचा फोटो जोडून तिच्या वडिलांना पाठवला व तुझ्या मुलीला उचलून नेईन, तू काहीच करू शकणार नाही, असा व्हॉईस मॅसेज केल्याची घटना सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौराह परिसरात घडली.

    दिनेश बगदारामजी देवासी (रा.थूर, ता. रामसिन, जि.जालोर, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. एका वर्षापूर्वी त्याची ओळख इन्स्टाग्रामवर तिच्याशी झाली. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क केला. मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. तिने तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतरही आरोपीने वारंवार तिच्या मोबाईलवर संपर्क करून तगादा सुरूच ठेवला. माझ्यासोबत मैत्री कर, नाहीतर समाजात तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली.

    तसेच १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता मुलीच्या वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर त्याने फोटो पाठवला. तो फोटो त्यांनी डाऊनलोड करून पाहिला असता, त्यांच्या मुलीच्या फोटोसोबत आरोपीने स्वतःचा फोटो एडिटिंग करून जोडलेला दिसून आला. तसेच व्हॉईस मॅसेज केला. त्यात त्याने ‘मैं आपकी लडकी को लेकर जाऊंगा’, अशी धमकी दिली.

    या प्रकाराने घाबरलेल्या मुली व वडिलांनी १५ फेब्रुवारी रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड हे करत आहे.