वर्षभरापूर्वी चोरला ट्रॅक्टर अन् दुचाकी; आठ जणांवर गुन्हा दाखल 

पाटस येथील सुहास डुबे या शेतकऱ्याच्या शेतात जबरदस्तीने घुसून शेतातील काढणीस आणलेला कांदा काही जणांनी काढून नेला. याच लोकांनी एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटारसायकल चोरून नेली होती. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    पाटस : पाटस येथील सुहास डुबे या शेतकऱ्याच्या शेतात जबरदस्तीने घुसून शेतातील काढणीस आणलेला कांदा काही जणांनी काढून नेला. याच लोकांनी एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटारसायकल चोरून नेली होती. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    दौंड तालुक्यातील पाटस येथील सुहास डुबे यांच्या शेताततून एक वर्षापूर्वी ५ लाख ९० हजार रूपयांची ट्रॅक्टर ट्रॉली व मोटारसायकलची चोरी करण्यात आली होती. त्याच आरोपींनी रविवारी (दि. ८) रोजी पुन्हा तसेच शेतातील चार टन काढणीस आलेला तीस हजार रुपयांचा कांदा काढून नेला. त्यामुळे एकूण ६ लाख २० हजारांच्या वस्तू चोरी केल्या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना दौंड न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.

    धुळा कोकरे, नवनाथ कोकरे, किसन साहेबराव कोकरे, नवनाथ किसन कोकरे, गणेश किसन कोकरे व प्रशांत धुळा कोकरे अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस येथील शेतकरी विठ्ठल तात्याबा डुबे यांचे भाऊ संजय डुबे व वहिनी सुंदरा या दोघांचे मयत झाल्यावर आरोपींनी एक वर्षापूर्वी त्यांच्या शेतातील ५ लाख ९० हजार रूपयांची ट्रॅक्टर, ट्रॉली व मोटारसायकल चोरून नेले होते.

    तसेच रविवारी (दि.८) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी पुन्हा एकदा शेतात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना दौंड दिवाणी न्यायालयाने सुहास डुबेंच्या शेतात जाण्यास मनाई केल्याचा आदेश दिला होता. मात्र, आरोपी शेतात घुसले आणि त्यांनी शेतातील कांदा काढुन तेथे नुकसान केले.