उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील झाडांच्या फांद्या तोडणे पडले महागात; दोघांवर गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांच्या बारामती येथील सहयोग भवन या निवासस्थानासमोरील झाडांच्या फांद्या तोडल्याप्रकरणी दोघांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांच्या बारामती येथील सहयोग भवन या निवासस्थानासमोरील झाडांच्या फांद्या तोडल्याप्रकरणी दोघांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    पांडुरंग माने (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बारामती) व दिलीप बाबूराव जगदाळे (रा. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष जगन्नाथ वाबळे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे १० जूनला उपुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या सहयोग भवन याठिकाणी ड्युटी बजावत असताना बंगल्याची पाहणी करत होते. त्यावेळी बंगल्याच्या कंपाऊंडच्या आत लावलेल्या झाडांच्या फांद्या कोयत्याने बाहेरच्या बाजूने एक व्यक्ती तोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

    फिर्यादी वाबळे यांनी त्या व्यक्तीला विचारणा केली असता, त्याने दिलीप जगदाळे यांच्या सांगण्यावरून झाडे तोडत असल्याचे सांगितले. यातील संशयित आरोपींनी २० ते २५ झाडांच्या फांद्या तोडून त्या घेऊन जात असल्याचे फिर्यादी वाबळे यांनी पाहिले. ही झाडे विनापरवानगी तोडत असल्याने संतोष जगदाळे यांनी दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपींवर चोरीचा व महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार जगताप करत आहेत.