सिंहगड रस्त्यावर दुचाकीच्या शोरुमला आग, २५ दुचाकी जळाल्या; सुदैवाने जिवीतहानी नाही

सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिराजवळील दुचाकीच्या शोरुमला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या आहेत.

    पुणे : सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिराजवळील दुचाकीच्या शोरुमला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत जिवीत हानी झाली नाही. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

    सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिराजवळ टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीचे शोरुम आहे. गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकी शोरुममधून धुर येत असल्याचे दिसून आले. लागलीच याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दल व पोलीस यंत्रणेला दिली. तोपर्यंत आग भडकली.

    मोठ्या प्रमाणात आग लागल्याने आगीत शोरूममधील दुचाकी आगीच्या विळख्यात अडकल्या गेल्या. अग्निशमन दलाच्या पाच फायर बंब व जवानांनी घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियत्रंण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. पण आग मोठ्या प्रमाणात होती. पाण्याचा मारा करून जवानांनी अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली.

    परंतु, या आगीत २० ते २५ दुचाकींना झळ पोहोचली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी ही कामगिरी केली. आगीमागचे कारण समजू शकले नाही.