दिवाळीचा जल्लोष सुरू असताना नाशिकमध्ये अग्नितांडव, एमजीरोड बाजारपेठेत 5 ते 6 दुकानं जळून खाक!

काल मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीत जवळपास 5 ते 6 दुकानं जळून खाक झाली आहेत.

    काल राज्यभरात दिवाळीच्या जल्लोष सुरू होता. सगळीकडे उत्साहाच आणि चैतन्याचं वातावरण होत. मात्र, नाशिकमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गजबजलेले ठिकाण असलेल्या एमजी रोड (MG Road) परिसरात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत जवळपास पाच ते सहा दुकानं जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या रात्री उशिरापर्यंत जवानांकडून आग विझवण्यात आली.

    कशी लागली आग

    नाशिकमधील वर्दळीच ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम जी रोड परिसरात ही घटना घडली. एमजी रोडवरील रेडक्रॉस सिग्नलजवळ वर्धमान शोरूमला रात्री 11 वाजेच्या सुमारास आग लागली. यावेळी परिसरात दिवाळीचा जल्लोष सुरुच होता. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बघता बघता काही वेळेतच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे या आगीची झळ  लगतच्या बुक डेपो, संगीत विद्यालय यासह आजूबाजूच्या अन्य 5 ते 6 दुकानांनाही बसली. या सर्व दुकानांत दिवाळीचे साहित्य उपलब्ध असल्याने आगीच्या घटनेत अनेक दुकानातील कोट्यावधी रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाचे जवळपास 15 बंब घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकलेले नाही.