बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट

    बदलापूर – बदलापूरमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. खरवई एमआयडीसीमध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीला आज दुपारी (दि.02) आग लागली. आग लागलेल्या केमिकल कंपनीचे नाव डि.के.फार्मा असे आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवळच असलेल्या बदलापूर अग्निशमन दलाच्या फायर सेंटरमधून दोन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.

    केमिकल कंपनीला आग लागल्यामुळे धुराचे मोठे लोट एमआयडीसीमध्ये पसरले होते. आगीचे प्रमाण इतके जास्त होते की अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अग्निशमन दल अजूनही आग नियंत्रणामध्ये आणण्याचे अथक प्रयत्न करत आहे.

    या पूर्वी देखील नवी मुंबईतील खेळणे एमआयडीसी परिसरात नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती. आगीची भीषणता जास्त होती. त्यामुळे शेजारी असणाऱ्या दोन कंपन्यांना देखील आगीने आपल्या भक्षस्थानी घेतलं (Badlapur Fire Accident) होतं. नवभारत केमिकल, क्लीनकेम लॅब आणि जास्मिन आर्ट अँड प्रिंट या तीन कंपन्यांना ही आग लागली होती. यावेळी देखील केमिकल कंपनीला आग लागली असून आगीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही.