सरणाला पेटवताना अग्नीचा भडका उडाल्याने तीघेजण भाजले, दोघांचा मृत्यू

सरण पेटवताना भडका उडाल्याने तीघे जण जखमी झाले होते. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुरला हलविण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे या दोघांचा मृत्यू झाला.

    नागपूर : अंत्यसंस्कारासाठी (सरण) चिता पेटवताना आगीची भडका झाल्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिघे जण भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली आहे. दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी मृतकांची नावे आहेत.

    कधी घडली घटना?

    गुरुवारी संध्याकाळी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे एका स्थानिक रहिवासी सिद्धार्थ अंतुजी हुमने यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते. अत्यंसंस्कारासाठी सगळी तयारी करण्यात आली. दरम्यान,  सरण पेटवत असताना डिझेलचा भडका उडालायामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर बुधाजी खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघे भाजले गेले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुरला हलविण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.