पुण्यातील हरका नगर येथे वसतिगृहामध्ये आग; कोणत्याही विद्यार्थ्यांना इजा नाही

पुण्यात आज हरका नगर येथील वसतिगृहामध्ये आग लागल्याची घटना घडली.

    पुणे – पुण्यात आज हरका नगर येथील वसतिगृहामध्ये आग लागल्याची घटना घडली. आज दुपारी साडे चार वाजता भवानी पेठेतील हरका नगर येथे गोल्डन ज्युब्ली टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे मुलांच्या वसतिगृहात आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. यानंतर लगेचच मुख्यालयातून एक फायरगाडी व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आली.

    घटनास्थळी जवान पोहोचताच निदर्शनास आले की, इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये असणाऱ्या वसतिगृहात दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ०४ मध्ये आग लागली होती. जवानांनी तातडीने श्वसनाचे उपकरण (बी ए सेट) आगग्रस्त खोलीमध्ये नेले. कोणीही विद्यार्थी अडकले नसल्याची खात्री करत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवत पुढील धोका दूर केला. आगीमध्ये कोणीही जखमी नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीमध्ये गाद्या,बेंच, पंखे व इतर जीवनावश्यक वस्तु जळाल्याने नुकसान झाले.

    या कामगिरीत अग्निशमन दलाचे वाहनचालक अतुल मोहिते, दत्तात्रय वाघ व तांडेल मंगेश मिळवणे आणि जवान आझीम शेख, सागर ठोंबरे, अजय कोकणे, किशोर कारभाळ, मयुर ढुबे, संकेत सरडे, सागर शिर्के यांनी सहभाग घेतला.