Tathwade Fire
Tathwade Fire

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजच्या परिसरात उभ्या असलेल्या तीन ते चार स्कूल बसने रविवारी (दि.८) रात्री सव्वा अकराच्या सुमारास अचानक पेट (School Bus Fire) घेतला. त्यानंतर काही वेळातच तीन मोठे स्फोट झाले.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजच्या परिसरात उभ्या असलेल्या तीन ते चार स्कूल बसने रविवारी (दि.८) रात्री सव्वा अकराच्या सुमारास अचानक पेट (School Bus Fire) घेतला. त्यानंतर काही वेळातच तीन मोठे स्फोट झाले. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, परिसरातील इमारतींमध्ये राहणारे नागरिक घाबरून रस्त्यावर आले होते. दरम्यान, अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.

    एवढी मोठी आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच, या घटनेत कोणी जखमी अथवा जीवितहानी झाल्याचेही वृत्त नाही. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जेएसपीएम कॉलेज परिसरात तीन ते चार स्कूल बसला आग लागली. परिसरातील इमारतींमध्ये राहणारे नागरिक आपल्या घराच्या खिडक्यांमधून आगीची घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होते. तेवढ्यात याच ठिकाणी एकापाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले.

    स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने आसपासच्या इमारतींना हादरा बसला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. रात्री उशिरापर्यंत ते आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते.

    दरम्यान, या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.