आजऱ्यात दोन घरांना भीषण आग; साडेपाच लाखांचे साहित्य जळून खाक

आजरा येथील सुतार गल्लीत भागूबाई मंदिराशेजारी भरवस्तीत असणाऱ्या नरेंद्र मनोहर सुतार, अमर शिवाजी सुतार, हणमंत सुतार या सुतार कुटुंबियांच्या घरांना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग (Fire in Ajara) लागल्याने चांगलाच गोंधळ उडाला. अल्पावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीमध्ये सुतार बंधूंच्या मशीनरीसह तयार केलेल्या फर्निचर व घराचे सुमारे साडेपाच लाखांचे नुकसान झाले.

    आजरा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आजरा येथील सुतार गल्लीत भागूबाई मंदिराशेजारी भरवस्तीत असणाऱ्या नरेंद्र मनोहर सुतार, अमर शिवाजी सुतार, हणमंत सुतार या सुतार कुटुंबियांच्या घरांना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग (Fire in Ajara) लागल्याने चांगलाच गोंधळ उडाला. अल्पावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीमध्ये सुतार बंधूंच्या मशीनरीसह तयार केलेल्या फर्निचर व घराचे सुमारे साडेपाच लाखांचे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यासाठी गडहिंग्लज येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

    रात्रीची वेळ असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यावर अनेक मर्यादा येताना दिसत होत्या. अखेर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात सर्वांना यश आले. परंतु या आगीमध्ये सुतार कुटुंबियांचे प्रापंचिक साहित्य, व्यवसायाची मशीनरी,तयार फर्निचर यासह इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी भेट देऊन माहिती घेतली. सुदैवाने आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

    अग्निशमन दलाच्या गाडीची गरज अधोरेखित

    आजरा तालुक्यात वारंवार जळीताच्या घटना घडत असतात. आग विझवण्यासाठी गडहिंग्लज येथील अग्निशमन विभागाच्या गाडीवर अवलंबून राहावे लागले. घटनास्थळी गाडी येईपर्यंत बरेच नुकसान होताना दिसते. या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीने अशा सुसज्ज गाडीची व्यवस्था करणे आवश्यक ठरत आहे.