फटाका स्टाॅलधारकांना दणका ; नदीपात्रात कचरा टाकल्याने दंडात्मक कारवाई

३४ स्टाॅलधारकांच्या अनामत रकमेतून दंडाची रक्कम वसूल

    पुणे : शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने नियमावली केली असली, तरी शहरातील फटाका स्टाॅलधारकांनी मात्र या नियमावलीला हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीच्या कालावधीत नदीपात्रात उभारलेल्या फटाका स्टाॅलधारकांनी स्टाॅल काढल्यानंतर राडारोडा तेथेच टाकल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा महापालिकेने उगारला आहे. अस्वच्छता केल्याप्रकरणी नदीपात्रातील ३४ स्टाॅलधारकांच्या अनामत रकमेतून दंडाची रक्कम वसूल करावी, असा प्रस्ताव कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाला दिला आहे.

    दिवाळीच्या कालावधीत मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून नदीपात्रात फटाका विक्री स्टाॅल उभारण्यास परवानगी दिली होती. ऑनलाइन लिलाव पद्धतीने गाळे भाड्याने देण्यात आले होते. स्टाॅलधारकांनी दैनंदिन कचरा घंटागाडीला द्यावा, अशी लेखी सूचना त्यांना देण्यात आली होती. मात्र स्टाॅलच्या आजूबाजूचा परिसर आणि स्टाॅल खालील बाजूला साठणारा कचरा तसाच ठेवण्यात आला होता. दिवाळीनंतर एक एक स्टाॅल काढण्यात आले; मात्र स्टाॅलधारकांकडून कचरा तसा ठेवण्यात आला होता.

    शहरातील प्रदूषण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर फटाका स्टाॅलधारकांचा निष्काळजीपणा पुढे आल्यानंतर कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अमोल पवार यांनी त्याची दखल घेतली होती. कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर आरोग्य निरीक्षकांकडून स्टाॅलधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून फटाका स्टाॅलधारकांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली होती. त्यापोटी त्यांच्याकडून काही अनामत रक्कमही घेण्यात आली होती. या रकमेतून दंडाची रक्कम वसूल करावी, असा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाला दिला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त अमोल पवार यांनी दिली.
    स्टाॅलधारकांकडून राडारोडा तसाच टाकण्यात आल्यानंतर त्यांच्यावर यापूर्वीच दंडात्मक कारवाई करण्यात येणार होती. या सर्व ३४ स्टाॅलधारकांना एकत्रित दंड ठोठावण्यात येणार होता. त्याला स्टाॅलधारकांनीही सहमती दर्शविली होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता दंड भरणार नाही, असा पवित्रा स्टाॅलधारकांनी घेतल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या नियमानुसार स्टाॅलधारकांना किमान पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडे दंड भरल्याची पावती दाखविल्यानंतरच त्यांना अनामत रक्कम मिळणार आहे, असे पवार यांनी सांगितले.