कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत फोडले फटाके; मुंबई पोलिसांकडून तब्बल ‘इतक्या’ जणांवर कारवाई

दिवाळीच्या सणात फटाके फोडण्यावर न्यायालयाने वेळेचे निर्बंध लावले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली असून मागील तीन दिवसात मुंबईत ८०६ जणांविरुद्ध कारवाई करून ७८४ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

    मुंबई : मुंबईत हवेत वाढलेल्या प्रदूषणाची दखल खुद्द उच्च न्यायालयाने घेतली आहे. दिवाळीच्या सणात फटाके फोडण्यावर न्यायालयाने वेळेचे निर्बंध लावले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली असून मागील तीन दिवसात मुंबईत ८०६ जणांविरुद्ध कारवाई करून ७८४ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. सर्वात अधिक गुन्हे पश्चिम आणि उत्तर उपनगरात करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षावर तब्बल आठ हजार कॉल्स आले होते. पोलिसांची फोन लाईन सतत व्यस्त असल्याने अनेकांना कॉल लावण्यात अडचणीही आल्या. फटाक्यांपासून त्रास होत असल्याने अनेकांनी ट्विटरवर देखील तक्रारी केल्या.

    आत्तापर्यंत फटाके आणि वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केली ८०६ जणांविरुद्ध कारवाई केलीये. तर एकूण ७८४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ८०६ जणांपैकी ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीये.

    वेळेचं बंधन न पाळणाऱ्यांवर तसेच पर्यावरण पूरक फटाक्यांऐवजी दुसरे फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. मुंबईतील वाढतं वायुप्रदूषण पाहता फटाके रात्री ८ ते १० पर्यंत वाजवण्यास उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.