त्यांना 6 महिन्यापूर्वीच घालवले, मी छोटी आव्हानं स्विकारत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले…

कोळी बांधव हा दर्याचा राजा आहे. तो प्रेमळ, निडर आणि संघर्ष करणाराही आहे. मी स्वतः माशांचा व्यवसाय केला असल्याने माझे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. मच्छिमारी करताना बोटींना अडचण निर्माण होईल यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दोन खांबांमधील अंतर वाढविण्याची रास्त मागणी त्यांनी केली होती.

    मुंबई- कोळीवाडे (Koliwada) हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती (Culture) जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांसाठी १२० मीटरचा नेव्हीगेशन स्पॅन कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल वरळी कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

    आदित्य ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर…

    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोळी बांधव हा दर्याचा राजा आहे. तो प्रेमळ, निडर आणि संघर्ष करणाराही आहे. मी स्वतः माशांचा व्यवसाय केला असल्याने माझे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. मच्छिमारी करताना बोटींना अडचण निर्माण होईल यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दोन खांबांमधील अंतर वाढविण्याची रास्त मागणी त्यांनी केली होती, त्यामुळे शासनाने ती मान्य करून दोन खांबांमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून कोळी समाज हा मुंबईचे मजबूत पिलर असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. याबरोबरच सिमांकन करणे, डिझेल परतावा, गोल्फा देवीच्या मंदिराचे पुनर्निर्माण आदी प्रश्न देखील सोडविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाचा समाचार घेतला, मी ज्यांना घालवायचे होते, त्यांना सहा महिन्यापूर्वी घालवले आहे, मी छोटी आव्हानं स्विकारत नाही, एकनाथ शिंदे मोठी आव्हान स्विकारतो, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर दिलं.

    कोळीवाड्यांचा विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी खाद्य महोत्सव आयोजित करणे, पर्यटनदृष्ट्या विकास करणे आदी निर्णय घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबई खड्डेमुक्त करणे, आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोचे जाळे उभारणे, कोस्टल रोड प्रकल्प आदी कामांना गती देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

    कोळीवाड्यांच्या विकासाचा मास्टरप्लॅन तयार- केसरकर

    कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. मच्छिमार बांधवांचे जीवन सुकर व्हावे आणि कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोळीवाड्यांच्या विकासाचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. येथील खाद्यपदार्थांचा सर्वांना आस्वाद घेता यावा यासाठी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. मच्छिमारी करणे सोयीचे व्हावे यासाठी नेव्हीगेशन स्पॅन वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. कोळीवाड्यात फिरता येण्यासाठी पालकमंत्री म्हणून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोळीवाड्यात धक्के (जेट्टी), मासे सुकविण्यासाठी जागा, घरांना आकर्षक रंग असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री आशिष शेलार, विजय शिवतारे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.