Firing of youth after being fired
Firing of youth after being fired

  पुणे : कामावरून काढून टाकल्याच्या गैरसमजातून दोघांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ घडली. या घटनेत तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

  बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळील प्रकार

  आकाश बाणेकर (वय २८, रा. लवळे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदित्य दीपक रणावरे व सागर लक्ष्मण बनसोडे यांना अटक केली आहे. हा प्रकार बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

  निलेशला महाबळेश्वर हॉटेलजवळ बोलावून घेतले

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निलेश पिंपळकर व रोहित ननावरे हे दोघे चारचाकी गाडीच्या शोरूममध्ये कामाला आहेत. रोहित याचे तेथील कामगारांशी वाद झाले होते. त्यानंतर रोहितला शोरूममधून कामावरून काढून टाकले होते. रोहितला त्या वादामुळेच मला काढून टाकल्याचा गैरसमज झाला. त्याने निलेशला महाबळेश्वर हॉटेलजवळ बोलावून घेतले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला.

  पिस्तूल अवैधरित्या वापरले असल्याचे निष्पन्न

  त्यानंतर तेथील मुलांनी रोहित ननावरे याला घरी नेऊन सोडले. तेथे तक्रारदार, आकाश बाणेकर हे तेथे बोलत थांबले होते. तेव्हा आदित्य रणावरे, सागर बनसोडे यांच्याशी त्यांचा वाद झाला. तेव्हा आदित्य याने घरातून पिस्तूल आणले तसेच बेछुट गोळीबार केला. त्यातील गोळी आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली़ चतु:श्रृंगी पोलिसांनी लागलीच पसार झालेल्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडील गावठी पिस्तुल, व दोन जिवंत राऊंड जप्त केले आहेत. हे पिस्तूल अवैधरित्या अदित्य वापरत असल्याचे दिसून आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.