
'कोणाशी बरोबरी करत आहात तुम्ही? आमदारकीचं सोडून द्या, एकनाथ शिंदेंशी बरोबरी करणं तुम्ही सोडून द्या', असे बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना उद्देशून म्हटले आहे.
ठाणे : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) दिवसेंदिवस अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. विविध मुद्यांवर राजकीय वाद देखील होताना दिसत आहे. त्यानंतर आता बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना प्रतिआव्हान दिले आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिल्यानंतर त्यावर आता नरेश मस्के यांनी प्रतिआव्हान दिले. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कोणाशी बरोबरी करत आहात तुम्ही? आमदारकीचं सोडून द्या, एकनाथ शिंदेंशी बरोबरी करणं तुम्ही सोडून द्या. आत्ता नगरसेवकाच्या निवडणुका आहेत माझ्या विरुद्ध उभे राहा आणि नंतर शिंदेंच्या विरुद्ध उभे राहण्याची तयारी करा. महाविकास आघाडीत जे काही चालू आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आहे, अशा शब्दांत मस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानावरून टोला लगावला. तसेच महाविकास आघाडीमध्ये काही बॉम्ब लागणार आहेत, ‘आगे आगे देखो होता हे क्या…’, असे सूचक विधानही त्यांनी केले.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीमधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले. मात्र, त्यांनी ते स्वीकारले नाही. पण आता आपण दोघे राजीनामा देऊ. तुम्ही वरळी जिंकून दाखवा. अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात येऊन लढतो, असे खुले आव्हान दिले होते. त्यांच्या या विधानाचा मस्के यांनी त्यांच्या शब्दांत समाचार घेतला.