vishwajeet kadam

कडेगावात आमदार विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने बैठक निर्णय

    कडेगाव : सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील उसाला  पहिली उचल प्रतिटन ३ हजार १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी दिली.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांनी घेतलेला  हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले.याबाबत आता सोमवारी पुन्हा कारखानदारांची बैठक होण्याची शक्यता आहे.

    कडेगाव  येथे डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे  संचालक  आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने आयोजित कारखानदारांच्या बैठकीत हा ३ हजार १०० रुपये ऊसदर देण्याचा  निर्णय सर्वानुमते झाला आहे.असे  बैठकीनंतर आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले. या बैठकीत  खासदार संजय  पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, युवा नेते विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे व्हा.चेअरमन विजय पाटील, दत्त इंडियाचे जितेंद्र धारु, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.
    यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम म्हणाले  ज्या  साखर कारखान्यांनी मागील  वर्षी ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रतिटन रुपये २ हजार ९०० पेक्षा जादा ऊसदर अदा केलेला आहे. त्यांनी प्रति मेट्रीक टन ५० रुपये व २ हजार ९०० पेक्षा कमी दर अदा केलेल्या कारखान्यांनी मागील वर्षाच्या एफ.आर.पी. दरापेक्षा किमान रुपये १०० रुपये जादा दर अदा करण्यासंदर्भात  शासनाकडे प्रस्ताव दाखल करुन शासन स्तरावरून मंजूरी प्राप्त झालेनंतर ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.असे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी सांगितले.

    जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अद्याप ऊस दराची कोंडी फुटलेली नाही. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गतवर्षी तीन हजाराच्या आत असलेल्या कारखान्यांनी १०० रुपये आणि ३ हजारापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी ५० रुपये

    जादा देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय एकरकमी एफआरपी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील कारखानदार ऊस दराबाबत बोलायला तयार नव्हते. उसाची एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. तोडगा न निघाल्यास गाड्या फिरु न देण्याचा इशारा दिला आहे. परंतु कारखानदारांनी अद्याप एफआरपी बाबतीची भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.