आधी मुजरानंतर हास्यविनोद! उदयनराजे यांनी केली शिवेंद्रसिंहराजे यांची मिश्किली

साताऱ्याच्या राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात रविवारी हास्यविनोद झाल्याने मनोमिलनाच्या स्मृती जाग्या झाल्या. येथील शिवतीर्थावर भाजपच्या वतीने मेरी माटी मेरा देश या अभियानात उदयनराजे यांनी सुहास्य वदनाने शिवेंद्रसिंहराजे यांना मुजरा घातला.

    सातारा : साताऱ्याच्या राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात रविवारी हास्यविनोद झाल्याने मनोमिलनाच्या स्मृती जाग्या झाल्या. येथील शिवतीर्थावर भाजपच्या वतीने मेरी माटी मेरा देश या अभियानात उदयनराजे यांनी सुहास्य वदनाने शिवेंद्रसिंहराजे यांना मुजरा घातला. विरोधाचे संदर्भ बाजूला ठेवत ज्येष्ठ बंधू या नात्याने उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे  यांच्याशी दिलखुलास मिश्किली केली .

    या हास्यविनोदाने भाजपचे पदाधिकारी व दोन्ही राजे गटाचे पदाधिकारी मनोमनं सुखावले. खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे हे साताऱ्याच्या राजकीय पटलावरचे कट्टर विरोधक  गेल्या सव्वातीन वर्षापासून दोघेही भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. मात्र सातारा  नगरपालिकेतील राजकारणाच्या दुखऱ्या राजकीय संदर्भाने दोन्ही राजे एकमेकांचे गेल्या सात वर्षापासून कट्टर विरोधक असून एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र रविवारी भाजपच्या शिवतीर्थ येथे आयोजित कार्यक्रमात दोन्ही राजेंमध्ये सुखद संवाद दिसून आला. राजकारणात कायमच टायमिंग साधणाऱ्या उदयनराजे यांनी चक्क शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी मिश्किली केली. उदयनराजे यांचे शिवतीर्थावर आगमन होताच उपस्थित मान्यवरांना नमस्कार केला. शिवेंद्रसिंहराजे यांना पाहताच उदयनराजे यांनी थोडेसे झुकत त्यांना मुजरा केला. त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी हास्यविनोद करत संवाद साधला. सातारा लोकसभा मतदार संघाचे संयोजक व उदयनराजे समर्थक सुनील काटकर हे दोन्ही बंधूमध्ये असणाऱ्या आगळ्यावेगळ्या स्नेह क्षणांचे साक्षीदार ठरले. या निमित्ताने मनोमिलनाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

    राजकारणाच्या पलीकडचा स्नेह
    आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभेसाठी उमेदवारीचा विचार होताना भाजपश्रेष्ठींना उदयनराजे यांना विचारात ठेवावेच लागणार आहे. दुसरीकडे सातारा विधानसभा मतदारसंघात विशेषतः सातारा तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची मजबूत पकड आहे. भाजप श्रेष्ठींना ही समीकरणे हाताळताना कमालीचे कौशल्य दाखवावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची केलेली मिश्किली चर्चेचा विषय ठरली आहे. आजही दोन्ही भावांमध्ये राजकारणाच्या पलीकडचा स्नेह या निमित्ताने दिसून आल्याने राजे समर्थक सुखावले.