आधी परमबीर आता देवेन भारतींचे कनेक्शन समोर; शिनाचा बॉयफ्रेंड राहुल मुखर्जीचा नवीन खुलासा

शीना बोरा हत्येप्रकरणी दिवसेंदिवस नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून, आधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि आता आयपीएस अधिकारी देवेन भारती यांचे कनेक्शन समोर आले आहे.

    मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी दिवसेंदिवस नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून, आधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि आता आयपीएस अधिकारी देवेन भारती यांचे कनेक्शन समोर आले आहे. भारती यांनीच शीना हरविल्याची तक्रार दाखल न करण्याचा सल्ला दिल्याचा जबाब शिनाचा बॉयफ्रेण्ड राहुल मुखर्जीने शुक्रवारी सीबीआय विशेष न्यायालयात नोंदवला आहे.

    शीना बोरा हत्याप्रकऱणी सीबीआय विशेष न्यायालयात न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. शीनाचा बॉडफ्रेण्ड राहुल मुखर्जीची महत्वाची साक्ष नोंदवली जात आहे. शुक्रवारी राहुल मुखर्जीने पीटर आणि इंद्राणीसोबत त्याकाळात केलेले फोन रेकॉर्डिंग न्यायालयात सादर केले. तसेच शीना गायब झाल्यानंतर पीटर आणि इंद्राणी तत्कालीन पोलीस सह- आयुक्त देवेन भारतींना भेटले होते. तेव्हा, तुम्ही शीना गायब झाल्याची तक्रार दाखल करू नका, शीनाच्या मोबाईलवरून तिला ट्रेस करू, असे आश्वासन भारती यांनी दिले असल्याचे राहुलने न्यायालयात सांगतिले आहे.

    याआधी २०१२ रोजी शीना हलविल्याची माहिती तात्कालीन आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना दिली गेली होती. शीना हरवल्याची माहिती आयपीएस अधिकारी यांना होती. सिंग हे माझ्या आईच्या मित्राचे मित्र आहेत. त्यांनीच मला शीना हरवल्याची तक्रार करायला सांगितली होती. त्यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल कऱण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. असे राहुलने याआधी आपल्या जबाबात नमूद केले होते.

    दरम्यान २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर चौकशीदरम्यान या हत्याकांडाचा साल २०१५ मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने आपला पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. आणि २५ एप्रिल २०१२ रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक झाली होती. तर काही दिवसांपूर्वीच साडे सहा वर्षांनी इद्राणी जामीनावर बाहेर आहे.