kinnar asmita association parlour

ठाणे जिल्ह्यात जवळपास 1500 ते 1600 तृतीय पंथीय राहत असून भिक मागून किंवा शरीर विक्रीचा व्यवसाय करत हे तृतीय पंथीय आपली उपजीविका करतात. मात्र त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मागील 25 वर्षांपासून किन्नर अस्मिता असोसिएशन काम करत आहे.

कल्याण: तृतीयपंथियांना त्यांच्यातील गुणांना सहकार्य आणि आर्थिक मदतीचा हात देत समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने किन्नर अस्मिता असोसिएशनने (Kinnar Asmita Association) युएसएआयडीच्या(USAID) आर्थिक मदतीतून कल्याणमधील खडकपाडा परिसरात तृतीयपंथीयांसाठी पहिलं अद्ययावत पार्लर सुरु केलं आहे. अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हॅन्की आणि युएसएआयडीच्या उप मिशन डायरेक्टर कॅरेन क्लीमोव्स्की यांच्या हस्ते या सलूनचं उद्घाटन आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दिवसाचं औचित्य साधून करण्यात आलं. (First Transgender Parlour)

आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीतून उभारण्यात तृतीयपंथीयांनी तृतीय पंथीयासाठी उभारलेलं ठाणे जिल्ह्यातलं हे पहिलं सलून ठरलं आहे. यावेळी बोलताना अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हॅन्की यांनी यासारख्या सुंदर उपक्रमाला अर्थसहाय्य करत समाजातील सर्वात महत्वाच्या घटकाला स्वावलंबी होण्यासाठी आपण मदत करत असल्याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले. युएसएआयडी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गरजूंना मदतीचा हात देत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी काम करत असल्याचं सांगितलं.

ठाणे जिल्ह्यात जवळपास 1500 ते 1600 तृतीय पंथीय राहत असून भिक मागून किंवा शरीर विक्रीचा व्यवसाय करत हे तृतीय पंथीय आपली उपजीविका करतात. मात्र त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मागील 25 वर्षांपासून किन्नर अस्मिता असोसिएशन काम करत आहे. तृतीयपंथीयाना ब्युटी पार्लरमध्ये मिळणारी अपमानकारक वागणूक, त्यांना ग्राहक असताना न दिला जाणारा प्रवेश यासारख्या भेदभावामुळे दुखावलेल्या तृतीयपंथीयासाठी हक्काचं ब्युटी पार्लर असावं, या उद्देशाने हे पार्लर सुरु करण्यात आल्याचं किन्नर गुरु नीता केणे यांनी सांगितलं.