
मुंबईतील ढासळणारी हवेची गुणवत्ता, वाढते प्रदूषण याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने मुंबई महापालिका तब्बल पाच ठिकाणी 'वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र' उभारणार आहे. भायखळ्यातील राणीबागसह शिवडी, घाटकोपर, देवनार, कांदिवली येथील जागा या केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या केंद्रांतून मुंबईकरांना प्रदुषणाची माहिती व आरोग्य विषयक सल्ला दिला जाणार आहे(Five Air Quality Survey Centers to be set up in Mumbai! Information on pollution).
मुंबई : मुंबईतील ढासळणारी हवेची गुणवत्ता, वाढते प्रदूषण याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने मुंबई महापालिका तब्बल पाच ठिकाणी ‘वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र’ उभारणार आहे. भायखळ्यातील राणीबागसह शिवडी, घाटकोपर, देवनार, कांदिवली येथील जागा या केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या केंद्रांतून मुंबईकरांना प्रदुषणाची माहिती व आरोग्य विषयक सल्ला दिला जाणार आहे(Five Air Quality Survey Centers to be set up in Mumbai! Information on pollution).
औद्योगिक वसाहती, वाहनांची वाढती संख्या यासह विविध कारणांमुळे मुंबईतील प्रदुषणाचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोव्हेंबर २००९ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही केंद्र सुरू केली जाणार आहेत. पहिल्या टप्यात महापालिकेने किती सर्वेक्षण केंद्रे स्थापन करण्याचे निश्चित केले आहे, किती जागा ठरवण्यात आल्या आहेत, या केंद्रांचा उद्देश काय? अशी माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे मागितली होती. विभागाने लेखी माहितीद्वारे उत्तर दिले आहे.
या केंद्रांतून हवेच्या गुणवत्तेची वर्तमान स्थितीविषयक अचूक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. एलईडी फलकांद्वारे विभागनिहाय प्रदूषणाचे प्रमाण व वायु गुणवत्ता निर्देशांक यात हवेतील विविध घटक, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड इत्यादि माहिती तसेच आरोग्य विषयक सल्ला यांचा समावेश असणार आहे. हवामान विषयक घटक उदा. तापमान, हवेतील सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा यांची माहिती मिळणार असल्याचे, पालिकेने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक केंद्रावरील प्रदूषण पातळीबाबतची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याची लिंक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व्हरशी जोडलेली असेल. तसेच ही माहिती मोबाइल अॅपवर उपलब्ध होईल. सर्व स्वयंचलित वायु सर्वेक्षण केंद्राचा सहामाही व वार्षिक अहवाल संबंधित सरकारी यंत्रणांना सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. प्रदुषणाबाबत योजना आखण्यास धोरणकर्त्यांना अचूक माहिती उपलब्ध करून देणे, प्रदूषण नियंत्रणास सुलभता निर्माण करून स्वच्छ व हरीत मुंबईचे स्वप्न साकार होण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे, हे या केंद्रांचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, भायखळा, पंतनगर पालिका शाळा क्र.२ घाटकोपर पश्चिम, पालिका शाळा संकुल, शिवडी कोळीवाडा, शिवडी पालिका चारकोप प्रसूतीगृह, कांदिवली पश्चिम आणि शिवाजीनगर बेस्ट बस आगार, शिवाजीनगर देवनार येथे ही येथे केंद्रे उभारली जाणार आहेत.
केंद्रांतून अशी मिळणार माहिती?
– मुंबईतील प्रदुषणाचा अभ्यास
– तापमानातील चढ-उताराची नोंद
– हवेच्या गुणवत्तेची वर्तमान स्थिती
– एलईडी फलकांद्वारे प्रदूषणाचे प्रमाण
– उपाययोजनांसाठी आवश्यक सतर्कता
– आरोग्यविषयक सल्ला