नशिराबादजवळ अपघातात पाच जणांचा मृत्यू

    जळगाव : फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप (Bolero Pick Up) वाहनातून बकर्‍या घेऊन जाणार्‍या वाहनाला भरधाव वेगाने चुकीच्या बाजुने येणार्‍या ट्रकने (Truck) धडक दिली. या अपघातात पाच जण ठार झाल्याचे वृत्त आहे. नसिराबाद (Nasirabad) पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    जळगाव (Jalgaon) आणि नशिराबाद येथून बकर्‍या भरून एक (एमएच ४३ एडी : १०५१) बोलेरो पीकअप वाहन फैजपूर येथे बाजार असल्याने निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणार्‍या उड्डाणपुलाजवळ समोरून (भुसावळकडून) भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच ०९ एचजी : ९५२१) ट्रकने रॉंग साईडला (Wrong Side) येऊन या वाहनाला जोरदार धडक दिली. यानंतर हीच ट्रक अजून एका वाहनाला धडकली.

    भीषण (Accident) तिहेरी अपघातात पाच जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मृत झालेल्यांची ओळख पटलेली नव्हती.