
जिल्ह्यात पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा पहिला हप्ता घेऊनही पाच हजार लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम केलेले नाही. हे गंभीर बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित लाभार्थ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
सोलापूर : जिल्ह्यात पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा पहिला हप्ता घेऊनही पाच हजार लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम केलेले नाही. हे गंभीर बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित लाभार्थ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी घरकुल आवास योजनेचा नुकताच आढावा घेतला. यामध्ये सुमारे ५००० लाभार्थ्यांनी घरकुल बांधणीसाठी पहिला हप्ता उचलला पण घरकुल बांधकाम सुरूच केले नाही व बांधकाम सुरू केल्याचा दाखला देऊन दुसऱ्या हप्त्याची मागणीच केली नसल्याचे दिसून आले आहे. घरकुल बांधणी जिल्हा मागे पडल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन घरकुल योजनेला गती दिली आहे. पण यात लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी घरकुल पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे पण ५००० लाभार्थ्यांनी पहिला हप्ता उचलल्यानंतर घरकुलाचे पुढील बांधकामासाठी दुसऱ्या हप्त्याचे मागणीच केली नसल्याचे दिसून येत आहे. यात संबंधित लाभार्थ्यांनी बांधकामासाठी रकमा उचलून इतर कामासाठी खर्च केल्या का याचा ग्रामसेवकांमार्फत शोध घेण्यात येत आहे.
बांधकाम सुरू न झाल्यास रक्कम वसूल करणार
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संदीप कोहिणकर म्हणाले, घराचे बांधकाम सुरू न केलेल्या आणि दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज न केलेल्या सुमारे पाच हजार ६३ लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम सुरु करण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू केले नसल्याचे आढळल्यास त्या लाभार्थ्यांकडून घरकुलासाठी अदा केलेली रक्कम वसूल करण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात करावी, असे आवाहन कोहिणकर यांनी केले आहे.
असे आहेत ते लाभार्थी मंगळवेढा : १०४५
सांगोला : ९६४
माळशिरस : ७०१
माढा : ५११
अक्कलकोट : ४५४
सोलापूर दक्षिण : ४५१
करमाळा : ४१२
पंढरपूर : ३९९
मोहोळ : ३३७
बार्शी : ३२०
सोलापूर नॉर्थ : ६९
एकूण : ५०६३