लाचखोर महिला तलाठ्याला पाच वर्षे सक्तमजुरी

जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यास पाच वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागेल असेही म्हटले आहे.

    पुणे : जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यास पाच वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंध न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी ही शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागेल असेही म्हटले आहे.
    सीमा सुभाष कांबळे (वय ३७, रा. शिरवळ, जि. सातारा) असे शिक्षा झालेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. १६ नोव्हेंबर २०१५ रोजी कांबळे यांना लाच घेताना पकडले होते. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता.

    तक्रारदारांनी तीन गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करायची होती. तत्कालीन तलाठी कांबळे यांकडे अर्ज केला होता. नोंदीसाठी कांबळे यांनी लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. पुणे युनिटचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

    खटल्यात सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी सहा साक्षीदार तपासले. पोलिस नाईक जगदीश कस्तुरे व पोलिस हवालदार अतुल फरांदे यांनी सरकार पक्षाला न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.