
शहरातील मोरभवन हे शहर बसस्थानकही पूर्णपणे पाण्याखाली आले. बसेस अर्ध्याहून अधिक पाण्याखाली आल्या.
नागपूर : राज्यामध्ये त्याचबरोबर शहरामध्ये यापूर्वीही पूरस्थिती निर्माण झाली आहे परंतु ढगफुटीसदृश्य पाऊस पहिल्यांदाच नागपूरकरांनी अनुभवला आहे. फक्त चार तासांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मध्य नागपूरकरांना बसला आहे. पंचशील चौक परिसरामध्ये चार ते पाच फूट पाणी साचले होते. या परिसरामध्ये संख्या अधिक असून रुग्णालयांमध्येदेखील पाणी शिरले. तसेच शंकरनगरातील वोकहार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिट पाण्याखाली गेल्याचे वृत्त समोर आले होते. मध्यरात्री दोन वाजेपासून पहाटे पाचपर्यंत शहरात ढगांचा गडगडाट होता. तर मोठ्या प्रमाणात वीजा कडाडत होत्या.
आता नुकतीच नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपूरमधील परिस्थितीची माहिती दिली आहे. सकाळी स्थिती गंभीर होती आता नियंत्रणात आली आहे, प्रशासकीय विभाग आणि बचाव पथक सगळं नियोजन करण्यामध्ये प्रयत्नशील आहे. पुढे कधी अशी पूरपरिस्थिती उद्भवली तर त्याचे सुद्धा नियोजन कऱण्यात आले आहे. एक मृत्यु झाल्याचे समजते, पोस्टमॉर्टम झाल्यावर मुख्य कारण कळेल. पाणी तुंबणे ही मुख्य अडचण आहे, रात्री दोन वाजल्यापासून बचावकार्य सुरु आहे. सर्व प्रशासकीय विभाग सध्या कार्यरत आहेत असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
शहरातील मोरभवन हे शहर बसस्थानकही पूर्णपणे पाण्याखाली आले. बसेस अर्ध्याहून अधिक पाण्याखाली आल्या. सीताबर्डी मेट्रो स्थानकालाही पावसाचा फटका बसला. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अविरत मुसळधार पावसाने शुक्रवारी रात्री संपूर्ण नागपूरला झोडपून काढले आणि अनेक परिसर पुराच्या पाण्यात बुडाले. रात्रभर पडलेल्या पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झाले असून त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे.