रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त फुलांची मागणी वाढली, किलोला दर किती?

अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता. २२) सर्वत्र सण साजरा होत आहे. यानिमित्ताने पुणे शहरासह जिल्ह्यातून मंदिर सजावट आणि धार्मिक विधींसाठी विविध प्रकारच्या फुलांची मागणी वाढली. तसेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांचे भावही दुपटीने वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

  पुणे : अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता. २२) सर्वत्र सण साजरा होत आहे. यानिमित्ताने पुणे शहरासह जिल्ह्यातून मंदिर सजावट आणि धार्मिक विधींसाठी विविध प्रकारच्या फुलांची मागणी वाढली. तसेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांचे भावही दुपटीने वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
  अयोध्येतील कार्यक्रमानिमित्त शहर, जिल्हा आणि परिसरातील मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरांच्या सजावटीसाठी फुलांची मागणी वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या केशरी व पिवळ्या फुलांना ग्राहकांची विशेष मागणी आहे. परिणामी, गेल्या आठवड्याच्या तुलेनत भाव दुपटीने वाढले आहेत.
  बाजारात केशरी झेंडूला १०० ते १३० तर पिवळ्या झेंडूला ६० ते ७० रुपये भाव असल्याची माहिती फूल बाजारातील प्रमुख अडतदार सागर भोसले यांनी दिली. पुणे शहरातील किरकोळ फूल विक्रेत्यांसह विविध मंदिरांकडून थेट खरेदीमध्ये वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पुण्यासह कोकण आणि मराठवाड्यातून देखील मागणी वाढली आहे.

  मंदिरांची सजावट, मिरवणुकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. फुलांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

  - अरुण वीर (अध्यक्ष, फूल बाजार अडते असोसिएशन)
  असे आहेत भाव
  फुलांचे प्रतिकिलोचे भाव : झेंडू : ६०-१३०, गुलछडी : २००-२५०, अ‍ॅस्टर : जुडी : १५-३०, सुट्टा : १००-१३०, कापरी : ६०-१००, शेवंती : ८०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ३०-१००, डच गुलाब (२० नग) : ८०-२५०, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी : २००-३००, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, ऑर्चिड : ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : २००-४००.