विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला ६ ऑक्टोबरपासून प्रारंभ

प्रस्तावित करण्यात आलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील) दुमजली उड्डाणपुलाचे काम ६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

    पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) प्रस्तावित करण्यात आलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील) दुमजली उड्डाणपुलाचे काम ६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.विभागीय आयुक्तालयात पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुणे युनिफाइड मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी – पुम्टा) गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुमजली उड्डाणपुलाचे काम करणेसाठी पीएमआरडीएने या बैठकीत नियोजन सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार हे काम नोव्हेंबर २०२४ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

    याबाबत बोलताना पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर म्हणाले, ‘पुम्टाच्या बैठकीत चांदणी चौकातील जुना पूल २ ऑक्टोबरला पाडण्याचे आणि त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणची वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यानंतरच विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी आवश्यक पाया घेण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत गणेशखिंड रस्त्यालगत ११ मीटर रुंदीचे अडथळे उभे करून पाया घेण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.