पाण्यासह चारा प्रश्नही गंभीर; छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  मंचर : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर चारा छावण्या झाल्या नाही तर शेतकऱ्यांना बागायती भागातील नातेवाईकांकडे स्थलांतर करावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
  सातगाव पठार भागातील शेती ही प्रामुख्याने जिराईत स्वरूपाचे असल्याने शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. शेतीप्रमाणेच पिण्याचे पाण्याची टंचाई ही सातगाव पठार भागाला नेहमीच भासत असते. पण यावर्षी त्या टंचाईची तीव्रता जास्त आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्या कारणाने  वेळनदी मधून खळखळून पाणी वाहिले नाही. परिणामी लहान मोठ्या तलावात पाणीसाठा झालाच नाही.
  परंतु आता उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने दिवसभराच्या अति उष्णतेमुळे जमीन तप्त झाली आहे. पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खलावली असल्याने विहिरी, बोर मधील जलस्रोत आटले आहे. सातगाव पठारातील पेठ, कारेगाव, भावडी, कोल्हारवाडी ,थुगाव, कुरवंडी,पारगाव तर्फे खेड या सर्व गावांमध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवत आहे.  सातगाव पठार भागातील पेठ गावाला पाणीपुरवठा हा प्रामुख्याने खेड घाटातील इंदिरा पाझर तलाव जवळील  विहिरीतून होत असतो, पण तलावातीलच पाणी आटले असल्यामुळे विहिरीत पाणी येण्याचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे. त्यामुळे पेठ गावांमध्ये पंचायत समिती घोडेगाव मार्फत रोज एक टँकर ज्याच्या सरासरी तीन ते चार फेऱ्या करून  पाणी पुरवले जाते. पेठ मधील ठाकर वस्ती, बेट वस्ती भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवले जाते. हीच परिस्थिती कुरवंडी गावामध्ये आणि पठार भागातील सर्व गावांमध्ये दिसून येते.
  पाळीव प्राणी, जनावरे यांना सुद्धा पाणीटंचाईची झळ लागत आहे. पठार भागामध्ये पाणीटंचाई असल्यामुळे हिरवा चारा हा जनावरांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये साठवून ठेवलेल्या कडबा आणि सुखा चारा यावरच जनावरांचे भागावे लागते. पाण्याच्या कमतरतेमुळे पाळीव प्राणी धुण्यासाठी सुद्धा पाण्याची काटकसर करावी लागते. तीव्र उन्हामुळे  दूध उत्पादनामध्ये घट झालेली दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे गाई,  बैले शेळ्या यांच्यासह प्राण्यांच्या शरीरातील तापमान सुद्धा वाढत आहे. त्यामुळे प्राण्यांमध्ये भूक न लागणे, धापा टाकणे, सामान्य पेक्षा अधिक हळू चालणे असे आजार दिसून येतात. यावर अनेक गोपालक  यांनी जनावरांच्या गोठ्यांमध्ये विद्युत पंखे लावलेले दिसून येतात.  वाढत्या तापमानाचा मानवी शरीराव सुद्धा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. पठार भागांमध्ये ताप, उलटी जुलाब उष्माघात गोवर, गालफुगी त्वचेवर नागिनीसारखा आजार याचे रुग्ण वाढलेले दिसून येतात.

  पाणीटंचाई तीव्र स्वरूपात जाणवत असल्यामुळे खासगी टँकर विकत घेऊन पाणी शुद्धीकरण करून पाणी विकावे लागते. त्यामुळे सध्या तरी ना नफा ना तोटा या तत्त्वावरच पाणी प्लांट चालवावा लागतो. यात्रा हंगाम, लग्न हंगाम तसेच वाढत्या तापमानामुळे पाण्याला मागणी वाढली आहे.

  - विजय कंधारे, वाकेश्वर अक्वा पेठ

  मनुष्यप्राणी पाळीव प्राण्याप्रमाणे तीव्र उन्हाच्या झळा वन्य प्राण्यांना, पशुपक्षी यांना पण बसत आहे. त्यामुळे अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करताना दिसून येतात. तरी घराजवळील एखाद्या भांड्यात रोज पशुपक्षी वन्य प्राणी यांच्यासाठी पाणी आणि थोडे खाद्य ठेवावे.

  - डॉ. अरुण महाकाळ, पशुवैद्यकीय अधिकारी मंचर.